धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची केली हत्या: वाघमारे

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

मला 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी जवळपास 4 वाजेच्या सुमारास बंदूक दिली गेली. माझ्या बरोबर असलेली एक व्यक्ती व मी गौरी लंकेश यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्या घराजवळ आल्या होत्या. मी त्यांच्या गाडीजवळ पोहचण्यावेळी त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला होता. त्याचवेळी मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

बंगळुरू : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुराम वाघमारे यांनी दिली असून आपण त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचेही पोलिसांना सांगितले. 

हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने वाघमारे अटक केली आहे. एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले, की 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या झाली होती. ही हत्या नेमकी कोणी हे उघड होत नव्हते. गौरी यांच्या हत्येनंतर देशभर खळबळ माजली होती. त्यांच्या हत्येचा देशभर निषेधही व्यक्त करण्यात आला होता. 'धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे, असं मला पाच महिन्यापूर्वी सांगण्यात आले होते. मी त्यासाठी तयार झालो. ज्या व्यक्तीला मारायचे आहे त्याच्याबद्दल मात्र मला काहीच माहीच माहिती नव्हती असे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. 

3 सप्टेंबर रोजी मला बंगळुरूत नेण्यात आले. बंगळुरूत नेण्याआधी मला बेळगावात एअर गनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले होते. हत्येच्याआधी तीन वेळा तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी दुचाकीवरुन गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात नेले होते. पण, ते तिघे कोण होते, हे त्यांनी कधी सांगितले नसल्याचे वाघमारे याने सांगितले. 

मला 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी जवळपास 4 वाजेच्या सुमारास बंदूक दिली गेली. माझ्या बरोबर असलेली एक व्यक्ती व मी गौरी लंकेश यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्या घराजवळ आल्या होत्या. मी त्यांच्या गाडीजवळ पोहचण्यावेळी त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला होता. त्याचवेळी मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आम्ही परतलो आणि मी त्याच रात्री शहर सोडले अशी माहिती वाघमारे याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. 

Web Title: Gauri Lankesh murder case Parshuram Waghamare says behind murder truth