general bipin rawat
general bipin rawat

लोकांना हिंसाचारासाठी चिथावणी देणारे कधीच नेते असू शकत नाहीत - जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली - नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू असतानाच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज यावर थेट भाष्य करीत एका नव्या वादाला तोंड फोडले. लोकांना हिंसाचारासाठी चिथावणी देणारे कधीच नेते असू शकत नाहीत, असे विधान त्यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना केल्याने राजकीय वर्तुळातून त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

रावत हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत असून, त्यांनी अशा प्रकारचे राजकीय वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे मत काँग्रेसने मांडले आहे.‘‘नेत्याने नेतृत्व करायला हवे, जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा सर्व तुमचे अनुकरण करीत असतात. पण, लोकांना योग्य दिशेने नेणारेच खरे नेतृत्व होय. लोकांना चुकीच्या दिशेने नेणारे कधीच नेते असू शकत नाहीत. सध्या मात्र विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या लोकांना काही जण हिंसाचारासाठी चिथावणी देत आहेत. हे नेतृत्व असू शकत नाही,’’ असे परखड मत लष्करप्रमुखांनी मांडले. दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनावर भाष्य करणारे रावत हे पहिलेच लष्करी उच्चाधिकारी ठरले आहेत. काँग्रेसने रावत यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. लष्करप्रमुख हे नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाबाबत बोलत असतील, तर त्यांचे हे कृत्य घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहेत.

लष्करप्रमुखांना आपण राजकीय विषयांवर बोलण्याची परवानगी देणे म्हणजे उद्या त्यांना सत्ता हातात घेण्याची परवानगी देण्यासारखेच आहे, असा ट्विटहल्ला काँग्रेस प्रवक्ते ब्रिजेश कल्लाप्पा यांनी चढविला आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी रावत यांच्या विधानावर उपरोधिक भाष्य करताना त्यांच्या बोलण्याचा कल कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने असावा, असा टोला लगावला.

लोकांना हातात शस्त्रे घेण्यासाठी प्रेरित करणारा नेता कधीच असू शकत नाही, असे वक्तव्य लष्करप्रमुखांनी केले आहे. जनरलसाहेबांच्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. धार्मिक आधारावर नरसंहारासाठी आपल्या अनुयायांना चिथावणी देणाराही कधीच नेता होऊ शकत नाही. जनरलसाहेब तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का?
- दिग्विजयसिंह, नेते काँग्रेस

आपल्या कार्यालयाचे अधिकारक्षेत्र समजून घेणे हेदेखील नेतृत्व करण्यासारखेच आहे. नागरिकांचे सर्वोच्च प्राधान्य कशाला आहे, हे जाणून घेणे आणि ज्या संस्थेचे आपण प्रमुख आहात तिची प्रतिष्ठा योग्य पद्धतीने समजून घेणे, हेदेखील नेतृत्व करण्यासारखेच आहे.
- असदुद्दीन ओवेसी, प्रमुख, एमआयएम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com