जॉर्ज फर्नांडिस यांची राजकीय कारकीर्द; 'बंदसम्राट' म्हणून ओळख

जॉर्ज फर्नांडिस यांची राजकीय कारकीर्द; 'बंदसम्राट' म्हणून ओळख

मुंबई- दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी आज (ता.29) अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. जनतेचा नेता अशी ओळख असलेल्या फर्नांडिस यांच्या निधनानंतर कामगार नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख खरं तर आपल्याला बंदसम्राट म्हणूनच आहे. मुंबई बंद करण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांची राजकीय कारकीर्दीचा आढावा घ्यायचा झाल्यास जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नंतरच्या काळात त्यांनी इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कामगार संपाचे त्यांनी नेतृत्व केले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्रिपद भूषवले.

जुलै 1979 मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास नसल्याचं सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 1989मध्ये त्यांनी बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटवर लोकसभा निवडणूक जिंकली. विश्वनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री राहिले. बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांना एकत्र करत समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

1996च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पुढे 1998 आणि 1999च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. 1999च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला. 1998मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही काम बघितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com