अण्णांच्या मागण्यांवर आज ठोस निर्णय होण्याची अपेक्षा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 मार्च 2018

तोंडी आश्‍वासनावर विश्‍वास नाही 
अण्णा म्हणाले, की महाजन हे केवळ निमित्त आहेत. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. सरकारने काही मागण्या मान्य केल्याचे सांगितले; पण हे कसे करणार, किती कालावधीत करणार, त्याचा आराखडा काय, कायदा करणार तर किती महिन्यांत करणार, हे सारे लेखी घेऊन या, मगच आंदोलन समाप्त करण्याचा विचार आमची सुकाणू समिती करेल, असे मी त्यांना सांगितले. तोंडी आश्‍वासनावर आमचा विश्‍वास नाही. त्यामुळे केंद्राने लेखी निवेदन तयार करून ते संसदेत मंजूर करण्याची निश्‍चित कालमर्यादा समोर ठेवली तरच उपोषणाबाबत निर्णय होऊ शकतो. उद्या-परवापर्यंत मी वाट पाहणार आहे. 

नवी दिल्ली : लोकपाल कायदा व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पुन्हा भेट घेतली. मात्र या पाऊण तासाच्या चर्चेत ठोस निर्णय न झाल्याने अण्णांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू राहिले. अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक झाली असून, आज (मंगळवार) याबाबत ठोस निर्णय होईल, असा विश्‍वास महाजन यांनी व्यक्त केला. अण्णांनी सांगितले, की निश्‍चित कालमर्यादेसह पंतप्रधान किंवा मुख्य सचिवांच्या सहीचे लेखी निवेदन घेऊन सरकार येईल तेव्हाच उपोषणाच्या समाप्तीबाबत शक्‍य झाल्यास विचार करू. 

अण्णांचे वजन चार किलोने घटले असून, त्यांचा रक्तदाबही वाढला आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून, त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. डॉक्‍टरांच्या पथकाने आज तीन वेळा अण्णांच्या प्रकृतीची तपासणी केली. अण्णा सध्या 24 तासांतून केवळ तीन-चार वेळा पाणी पिऊन राहत आहेत. 

सरकार व अण्णा यातील मध्यस्त म्हणून महाजन यांनी आज पुन्हा अण्णांशी चर्चा केली. ते म्हणाले, की आजची चर्चा सकारात्मक झाली. अण्णांचे वय पाहून त्यांनी हे उपोषण लवकारत लवकर समाप्त करावे, असे केंद्राला वाटते. अण्णांच्या 10-11 मागण्या आहेत. कृषिमूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा देणे व शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्यासारख्या मागण्या पंतप्रधानांसह सरकारने याआधीच मान्य केल्या आहेत. काहींबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पी भाषणातच उल्लेख केला आहे. कृषी अवजारांवरील जीएसटी 12 टक्‍क्‍यांवरून पाच टक्के करावा यांसारख्या मागण्या सरकारला पूर्ण मान्य आहेत. याबाबत मी नितीन गडकरी व संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून उद्या पुन्हा चर्चेसाठी येणार आहे. उद्यापर्यंत हा प्रश्‍न निकाली निघेल. 

तोंडी आश्‍वासनावर विश्‍वास नाही 
अण्णा म्हणाले, की महाजन हे केवळ निमित्त आहेत. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. सरकारने काही मागण्या मान्य केल्याचे सांगितले; पण हे कसे करणार, किती कालावधीत करणार, त्याचा आराखडा काय, कायदा करणार तर किती महिन्यांत करणार, हे सारे लेखी घेऊन या, मगच आंदोलन समाप्त करण्याचा विचार आमची सुकाणू समिती करेल, असे मी त्यांना सांगितले. तोंडी आश्‍वासनावर आमचा विश्‍वास नाही. त्यामुळे केंद्राने लेखी निवेदन तयार करून ते संसदेत मंजूर करण्याची निश्‍चित कालमर्यादा समोर ठेवली तरच उपोषणाबाबत निर्णय होऊ शकतो. उद्या-परवापर्यंत मी वाट पाहणार आहे. 

Web Title: Girish Mahajan meet Anna Hazare at agitation place in Delhi