बिहार: युवतीवर सहा अल्पवयीनांचा सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

रात्रीच्या वेळी ही युवती शरीरधर्मासाठी बाहेर पडत असताना तिच्यावर मागून हल्ला करण्यात आला. सहा-सात जणांच्या टोळक्‍याने तिच्या डोळ्यांवर फडके बांधून तिला ओढत शेतामध्ये नेले. या हल्ल्यामुळे तिची शुद्ध हरपली

पटणा - एका 14 वर्षीय युवतीवर सहा अल्पवयीन मुलांनी पाशवी बलात्कार करुन तिला रेल्वे रुळांवर फेकून दिल्याची घृणास्पद घटना बिहारमध्ये घडली आहे. प्रचंड रक्तस्त्राव होऊन जखमी झालेली ही युवती रुळांवर निपचित पडल्याचे आढळल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यामधील लाखोचक गावामध्ये ही घटना घडली. पीडित युवती व आरोपींपैकी किमान दोन जण हे या गावामधीलच आहेत.

रात्रीच्या वेळी ही युवती शरीरधर्मासाठी बाहेर पडत असताना तिच्यावर मागून हल्ला करण्यात आला. सहा-सात जणांच्या टोळक्‍याने तिच्या डोळ्यांवर फडके बांधून तिला ओढत शेतामध्ये नेले. या हल्ल्यामुळे तिची शुद्ध हरपली. यानंतर काही वेळाने शुद्ध आल्यानंतर ती एका रेल्वेमध्ये असल्याचे तिला आढळून आले. तिने या टोळक्‍यांपैकी दोघांना ओळखताच तिला गाडीतून खाली फेकून देण्यात आले. दरम्यान, संबंधित युवती बेपत्ता झाल्याने हैराण झालेल्या कुटूंबीयांनी तिचा शोध सुरु केला होता. सुमारे 12 तासांनंतर ही युवती रुळांवर पडलेली आढळली.

प्रचंड जखमी झालेल्या या युवतीचा रक्तपात थांबविण्यासाठी तब्बल 24 टाके घालावे लागले. यानंतरही तिची प्रकृती गंभीर होत असल्याने तिला पटणा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील आपात्कालीन विभागामध्ये कोणत्याही उपचारांशिवाय तब्बल 14 तास तिला ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाबही निष्पन्न झाली आहे. येथील रखवालदारांनी उपचार सुरु करण्यासाठी पैसे मागत असल्याचा आरोप या युवतीच्या कुटूंबीयांनी केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: girl gang raped in bihar