हिजाब परिधान केल्याने विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पणजी : राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेसाठी (नेट) हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनीस परीक्षेस बसू न दिल्याने तिच्यावर वर्ष वाया घालवण्याची वेळ आली आहे. परीक्षेला गेल्यानंतर सुरक्षेचे कारण देत या विद्यार्थिनीस हिजाब काढण्यास सांगण्यात आले आणि तिचे कानही तपासण्यात आल्याचा खुलासा या विद्यर्थिनीने पत्रकार परिषद घेऊन केला. 

मानसशास्त्राची पदवी प्राप्त केलेल्या या सफिना खान या विद्यार्थिनीचे वर्ष यामुळे वाया गेले आहे. या विद्यार्थिनीला "नेट'ची परीक्षा उत्तीर्ण होण्याची इच्छा असल्याने तिने या परीक्षेसाठी अर्ज भरला होता आणि कसून अभ्यासही केला होता. 18 डिसेंबरला पणजीतील एका केंद्रावर परीक्षा देण्यासाठी गेल्यानंतर तिला सुरक्षेचे कारण देत हिजाब काढण्यास सांगितले आणि तिचा कान तपासण्यात आला. त्यानंतर तिने पुन्हा हिजाब घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला त्यासाठी अडविण्यात आले आणि हिजाब घालून परीक्षेला बसता येणार नसल्याचेही सांगितले. हिजाब न घालता बसणे हे मला माझ्या धार्मिक वैचारिक स्वातंत्र्याचा आणि माझ्याही स्वातंत्र्यांचा अनादर करीत असल्यासारखे वाटले आणि त्यामुळे मी परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतला आणि तेथून निघून आल्याचे सफिनाने सांगितले. 

संबंधित प्रकार राज्याची राजधानी असणाऱ्या पणजीत घडला होता. "यापूर्वीही मी दोन नेटची परीक्षा दिली होती. ही परीक्षा वास्कोमध्ये झाली होती आणि तेथे कोणीही माझ्या हिजाब घालण्याचा संदर्भ सुरक्षेसोबत जोडला नव्हता. हिजाब आणि सुरक्षा हे दोन वेगवेगळे विषय आहेत, संबंधित व्यक्‍तीने दोन गोष्टींचा संबंध जोडून मला दिलेली वागणूक अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे मला जाणवले. प्रत्येकाला आपले धार्मिक स्वातंत्र्य आहे, या विचाराचा मी पुरस्कार करीत आले आहे. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी निराशादायक होता,' असे सफिनाने सांगितले. 

Web Title: The girls admission denied wearing hijab