त्रिपुराच्या विकासासाठी भाजपला विजयी करा

यूएनआय
सोमवार, 8 मे 2017

त्रिपुराच्या विकासासाठी नागरिकांनी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज एका सभेत केले. या वेळी त्यांनी राज्यातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली.

कुमारघाट (त्रिपुरा) - त्रिपुराच्या विकासासाठी नागरिकांनी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज एका सभेत केले. या वेळी त्यांनी राज्यातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केंद्राने राज्याला दिलेल्या विकासनिधीचा दुरुपयोग केल्याचा दावा करत अमित शहा म्हणाले,''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्रिपुराला विविध योजनांतर्गत आतापर्यंत 35 हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र, राज्य सरकारने त्याचा योग्य वापर न केल्याने हे राज्य इतरांच्या तुलनेत मागे पडत आहे. मुख्यमंत्री सरकार आणि त्यांच्या पक्षाचे काही नेते रोझ व्हॅली गैरव्यवहारात अडकले असल्यानेच राज्य सरकारने याबाबत सीबीआय चौकशीची मागणी केलेली नाही. या प्रकरणी 10 हजार कोटींचा अपहार झाला असूनही राज्य सरकार गप्प आहे.'' आगामी विधानसभा निवडणुकीत माकपबरोबर थेट सामना करण्याचा भाजपचा निश्‍चय असून, मागील 25 वर्षांपासून असलेली डाव्यांची सत्ता संपुष्टात आणली जाईल, असेही शहा या वेळी म्हणाले. गरीब, आदिवासींच्या विकासाचे दावे करणाऱ्या राज्य सरकारने प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसल्याचा दावाही त्यांनी केला.

 

Web Title: Give power to BJP for tripura development