esakal | कोरोना मृतांच्या नातेवाइकांना तत्काळ ५० हजार; केजरीवालांची योजना
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

कोरोना मृतांच्या नातेवाइकांना तत्काळ ५० हजार; केजरीवालांची योजना

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या जवळच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे साह्य एकरकमी व तत्काळ दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिले. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत कोरोना पीडीतांच्या कुटुंबीयांना रोख अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने यंदा एप्रिल-मे-जून या ३ महिन्यांमध्ये दिल्लीतही हाहा:कार उडविला होता. सरकारी आकडेवारीनुसार दिल्लीत या काळात २५ हजारांहून जास्त लोकांनी प्राण गमावले. मात्र स्मशानभूमी व कब्रस्तानांतील चित्र यापेक्षा दाहक असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. केजरीवाल यांनी आज कोरोनाचा फटका बसलेल्या कुटुंबांसाठी सामाजिक सुरक्षा योजना जाहीर केली. ज्या कुटुंबांमधील कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या घरी जाऊन राज्य सरकारचे कर्मचारी मदतीची रक्कम देतील असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: इंडियन आर्मीची गोपनिय माहिती ISIला पुरवली; दोन जवानांना अटक

त्यांनी आज केलेल्या घोषणेनुसार ज्या मुलांनी कोरोना काळात आपले आई व वडील या दोघांनाही गमावले त्यांना वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत दरमहा अडीच हजार रुपये राज्य सरकारतर्फे देण्यात येतील. कोरोनात ज्या घरांतील कर्ता पुरुष मृत्यूमुखी पडला त्यांच्या कुटुंबीयांनाही दरमहा काही रक्कम सरकार देणार आहे. मात्र ही रक्कम किती असणार हे केजरीवाल यांनी आज जाहीर केलेले नाही. दरम्यान, आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी जे अर्ज येतील त्यात विनाकारण त्रुटी किंवा फटी काढू नका असे सक्त निर्देशही दिल्ली सचिवालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. केजरीवाल म्हणाले, की आपले जवळचे नातेवाईक मृत्यूमुखी पडल्याने व अंत्यसंस्कारांसाठीही कित्येक तास वाट पहावी लागल्याने या दुर्दैवी लोकांचे नातेवाईक अगोदरच संतप्त आहेत.

हेही वाचा: कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही; आरोग्य मंत्रालयाचा इशारा!

राज्य सरकार त्यांना कर्तव्य म्हणून आर्थिक मदत करत आहे. यात कोणावरही उपकार केले जात नाहीत. त्यामुळे या नातेवाइकांना अधिकाऱ्यांनी कागदपत्रांत त्रुटी दाखवून विनाकारण हेलपाटे मारायला लावू नये किंवा त्यांना मानसिक त्रासही देऊ नये, असे सक्त निर्देश आपण दिले आहेत. आम्ही लोक म्हणजे दिल्ली सरकार या मोठ्या संकटात लोकांच्या मदतीसाठी आहोत. त्यांना त्रास व मनस्ताप देण्यासाठी नाही.

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री

loading image