"जीएमडीए'ची गुगलला नोटीस 

पीटीआय
शुक्रवार, 29 जून 2018

गुगल इंडियाने कार्यालयासमोरील हरित पट्ट्यात विनापरवानगी रस्त्याचे बांधकाम केल्याप्रकरणी कंपनीला गुडगाव महानगर विकास प्राधिकरणाने (जीएमडीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, गुगलने कार्यालयाची इमारत युनिटेक लिमिटेडच्या मालकीची असून, युनिटेकनेच हा रस्ता बांधल्याचा खुलासा केला आहे

गुडगाव: गुगल इंडियाने कार्यालयासमोरील हरित पट्ट्यात विनापरवानगी रस्त्याचे बांधकाम केल्याप्रकरणी कंपनीला गुडगाव महानगर विकास प्राधिकरणाने (जीएमडीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, गुगलने कार्यालयाची इमारत युनिटेक लिमिटेडच्या मालकीची असून, युनिटेकनेच हा रस्ता बांधल्याचा खुलासा केला आहे. 

याविषयी "जीएमडीए'चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी एम. डी. सिन्हा म्हणाले, ""गुगलने कार्यालयासमोर वीस मीटर लांबीचा आणि 12 मीटर रुंदीचा रस्ता बांधला आहे. हा रस्ता कार्यालयाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशी जोडतो. मात्र, हा रस्ता हरित पट्ट्यातून जात आहे. कोणतीही परवानगी न घेता हा रस्ता बांधण्यात आला आहे. कंपनीने नियमांचा भंग केला असल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.'' 

गुगल इंडियाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. याचबरोबर हरित पट्ट्यात केलेले रस्त्याचे बांधकाम 12 तासांत काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपनीने हे बांधकाम न काढल्यास "जीएमडीए' ते काढेल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, या नोटिशीला उत्तर देण्यासाठी कंपनीला 24 तासांचा कालावधी देण्यात आला आहे. 

Web Title: GMDA notice to Google India for clearing green belt, building road