गोव्यात भाजप सगळीकडून कोंडीत

Goa BJP in Disaster
Goa BJP in Disaster

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दीर्घकालीन उपचारासाठी दिल्लीतील ए्म्समध्ये दाखल झाल्यानंतरच पर्यायी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सर्वबाजूने कोंडीत सापडला आहे. सध्या गोव्यात भाजप, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फ़ॉरवर्ड व तीन अपक्ष असे आघाडी सरकार आहे.

पर्रीकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दूरध्वनीवर पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केल्यापासून गेले दोन दिवस राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेले सहा महिने पर्रीकर उपचाराच्या निमित्ताने कार्यालयाच्या बाहेर असले तरी त्याचा एवढा बोलबोला झाला नव्हता. मात्र भाजपने दिल्लीतून राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल आणि संघटन सचिव बी. एल. संतोष यांना पाठवून आता या वातावरणाचा राजकीय महत्व वाढवले आहे. त्यातच सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपल्यासह आपल्या पक्षाचे तीन व तीन अपक्ष आमदारांसह भाजपच्या निरीक्षकांची भेट घेऊन भाजपने कोणताही निर्णय सहजासहजी घेऊ नये असे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे मगोचे तीन आमदार आहेत. त्यापैकी दोन आमदार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे निरीक्षक वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या बाहेर पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांची कार रात्री दिसून आल्याने या चर्चेस सकाळी पृष्टी मिळाली. त्यामुळे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दोन आमदारांसह पत्रकार परीषद घेत ही चर्चा फेटाळली. मात्र असे करताना त्यांनी मुख्ममंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्य प्रशासनाचा ताबा द्यायचा असल्यास तो मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे द्यावा अशी मागणी पुढे केली आहे. मगोचे सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री सध्या आहेत.

तिसरीकडे सरकार अल्पमतात येणार अशी शक्यता वाटल्याने काँग्रेसचे १६ आमदार आज प्रथमच एकत्र आले. विधीमंडळ गटांची बैठक विधानसभा संकुलातील विरोधी पक्ष नेत्याच्या दालनात विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली झाली त्याला सर्व १६ आमदार उपस्थित होते. त्यांनी लगेच सत्ता स्थापनेचा दावा करण्याचे ठरवले. त्यांनी क़ॉंग्रेस सत्तेवर आल्यास आणखीन किमान सहा आमदार पाठिंबा देतील असे गृहित धरले आहे. मात्र राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा या दिल्लीत असल्याने त्यांची भेट आज राज्यपालांशी होऊ शकली नाही. त्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ आज राजभवनावर जात मागितली आहे.

भाजपच्या गाभा समितीची बैठक आज पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत झाली. त्यात बहुतेकांनी नेतृत्व बदलाची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. नेतृत्व बदल करायचा झाल्यास मूळ भाजपमधील आमदाराचाच विचार त्यासाठी करावा अशी आग्रहाची मागणी केली आहे. या बैठकीनंतर दिल्लीला निघण्यापूर्वी राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल यांनी सांगितले, की सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.  आता याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना माहिती दिली जाईल. तेच याबाबत अंतिम निर्णय घेतील.

या साऱ्या घडामोडींमुळे कोणताही निर्णय घेताना सरकार टिकेल काय याचा विचार भाजपला करावा लागणार आहे. त्यामुळे पर्रीकर यांच्यानंतर काय या प्रश्नावर उत्तर शोधताना भाजप सगळीकडून कोंडीत सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com