मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखल

manohar parrikar
manohar parrikar

नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले आहेत. स्वादुपिंडावरील अमेरीकेतील उपचारानंतर त्यांना पचनसंस्थेशी गुंतागुंत निर्माण झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या आजाराविषयी व उपचाराविषयी सरकारने अधिकृतपणे कोणतीही माहिती आजवर दिलेली नाही. गेल्या फेब्रुवारीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. गोव्यात पर्यायी नेतृत्व द्यावे की अन्य कोणता मार्ग काढावा यांचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेणार आहेत. त्यासाठी आज पक्ष निरीक्षक गोव्यात दाखल होतील.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कलंगुट येथील खासगी रुग्णालयात मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काल घरी परतले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुन्हा आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी ते दाखल झाले आहेत.

राजकीय घडामोडींना वेग
पर्रीकर यांना अमेरिकेला पून्हा हलवले जाणार अशी चर्चा सुरु झाली असतानाच त्यांनी काल दुपारी पर्रा येथे मूळ घरी जात गणपतीचे दर्शन घेतले. तेथून ते इस्पितळात परत आल्यावर राजकीय नाट्याला सुरवात झाली. सुरूवातीला नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई मुख्यमंत्र्यांना येऊन भेटले. त्यांच्यापाठोपाठ भाजपच्या प्रदेश गाभा समितीचे सदस्य त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्र्यांना येऊन भेटले. अपक्ष आमदार असलेले महसूलमंत्री रोहन खंवटे आणि आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे हेही मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यामुळे नेतृत्वबदलाविषयी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती प्रसारीत होऊ लागली. मात्र त्याबाबत अधिकृतपणे कोणी काही सांगितले नाही.

घटकपक्षांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड यांचा समावेश आहे. या पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नेतृत्वबदल अटळ आहे. दरम्यान, विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांचाही एक गट भाजपा पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून आहे. 40 सदस्यीय राज्य विधानसभेत भाजपाचे 13, काँग्रेसचे 17, मगोपचे 3, गोवा फॉरवर्डचे तीन आणि उर्वरित अपक्ष सदस्य आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com