समर्थ नेतृत्व हरपले - लक्ष्मीकांत पार्सेकर

Manohar Parrikar
Manohar Parrikar

लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे लोकांना सुखा-समाधानाचे दिवस बघायला मिळाले. यामुळे अनेकांचे भले झाले. त्याच्या जाण्यामुळे गोमंतकीयांचे व भाजपचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्याच्याबद्दलच्या अनेक आठवणी मी माझ्या हृदयाच्या कप्प्यात सांभाळून ठेवल्या आहेत. 
- लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री

मनोहरचा भाऊ अवधूत हा माझा वर्गमित्र. मी नववीत असताना मनोहर न्यू गोवा हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. मी व अवधूत म्हापसा हायस्कूलचे विद्यार्थी. त्यावेळी अवधूतसोबत त्याच्या घरी येणे जाणे व्हायचे. अवधूतपेक्षा त्याचवेळी मनोहरशी माझी मैत्री झाली. त्याला आणखीनही एक कारण होते. आम्ही दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जायचो. त्यावेळी संघाची शिबिरे व्हायची, त्यातही आम्ही एकत्र होतो. मी नंतर इंटर सायन्सकडे वळलो आणि मनोहर आयआयटीत शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेला. तो सुटीत यायचा त्यावेळी त्याला आम्ही आवर्जून भेटायचो. पुढे मी शिक्षक झालो. तो व्यवसायाकडे वळला. संघाचे काम आम्ही दोघेही करायचो. संघाने ठरविल्यानुसार १९८९ मध्ये मी, राजेंद्र आर्लेकर आणि श्रीपाद नाईक यांनी भाजपचे काम सुरू केले. काम सुरू करण्यास तीन महिने होतात न होताच तोच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली.

मांद्रे मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी पोस्टर लावण्यास व बॅनर लावण्यासही मांद्रे भागात इतरांची अघोषित बंदी होती. रात्री लावलेले बॅनर व पोस्टर दिवसा फाडून टाकले जात. हे बॅनर्स व पोस्टर घेऊन त्यावेळी मनोहर यायचा. प्रतिकूल परिस्थितीत राजकारणाच्या क्षेत्रात दोन हात करणाऱ्या आपल्या मित्रांसाठी त्यानंतर निवडणूक होईपर्यंत तो दररोज यायचा. सकाळी येणे आणि रात्री उशिरापर्यंत आमच्यासोबत हिंडणे, हा त्या चा दिनक्रम बनला होता. त्यावेळी आमच्या बैठकांनाही लोक येत नसत. मग जमायचो. मधलामाज-मांद्रे, पालये, हरमल, केरी येथे आपापसांतच बैठका घ्यायचो. बोलणारे व ऐकणारे तेच तेच असायचे. त्यानंतर मनोहरला उत्तर गोव्यातून लोकसभेची तर श्रीपादला दक्षिण गोव्यातून निवडणूक लढविण्यास पक्षाने सांगितले. त्यावेळी मनोहरला ५० हजार मते मिळाली होती. भाजपचे मूळ या मातीत घट्ट रुजविण्याची ती खरी सुरवात होती. त्यावेळी स्व. प्रमोद महाजन आले होते. म्हापशाच्या सिरसाट सभागृहात श्रमपरिहाराची बैठक होती. खरेतर आमचा पराभव झाला होता. मात्र, काही हजार मते घेऊन दाखविली म्हणून त्यावेळी आम्ही आनंदोत्सवही साजरा केला होता. अशा अनेक आठवणी डोळ्यांसमोर येत आहेत. १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाशी युती केली आणि भाजपला चार जागा मिळाल्या. त्यावेळी १९९४ ते १९९९ या कालावधीत स्व. काशिनाथ जल्मी विरोधी पक्षनेते होते, भाजपचे विधीमंडळ गट नेतेपदी श्रीपाद होते. तरीही मनोहरची कामगिरी सरस होती. 

त्यामुळे लोकांना भाजप हा नवा पर्याय त्यावेळी दिसला. त्यापूर्वी भाजप दिल्लीत ठीक आहे, येथे भाजपकडे कोण आहेत, असा प्रश्‍न करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले होते. १९९९ च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढूनही दहा जागा जिंकल्या. मनोहर पक्षाचा राज्य सरचिटणीस होता. संघटनात्मक बांधणी त्यावेळी शिस्तबद्धपणे त्याने केली. त्याचा फायदा पक्षाला नंतर झाला. एखाद्या बैठकीला कोणी कार्यकर्ता आला नाही तर त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन विचारपूस करण्याची त्याची पद्धत अनोखी होती. त्यामुळे अनेकजण पक्षाशी जोडले गेले. 

मनोहरने त्यानंतर पक्षात एकही पद घेतले नव्हते. २००० मध्ये ११ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर १८ महिन्यांत राज्यातील जनतेला कल्याणकारी योजना म्हणजे काय ते प्रथमच समजले. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, सायबर एज, कामधेनू, भातपीक हमी भाव योजना, दुधाचा हमी भाव योजना मार्गी लागल्या. शैक्षणिक संस्थांना पायाभूत सुविधांसाठी सरकारने मदत देणे सुरू केले. लोकांना विकासाचा पर्याय सापडला. आजवर भाजप काय करेल, असे विचारणाऱ्यांना कामातून आणि निर्णयातून चपराक मिळाली होती. मनोहरच्या एकखांबी नेतृत्वाने सर्वसामान्य माणसाच्या हृदयात याच काळात मनोहरबद्दल स्थान निर्माण झाले होते. सरकारी योजनांचा मोठा विस्तार झाला. इफ्फीसाठी अल्पावधीत मल्टी प्लेक्‍स याच काळात उभारले गेले. नवा पाटो पूलही विक्रमी वेळेत पूर्ण झाला. हळदोणेच्या पुलाचीही अशीच कहाणी. जुनेगोवा बगलमार्ग याच काळात आकाराला आला. पायाभूत सुविधांची अनेक कामे याच काळात राज्यात सुरू होती. २००७ मध्ये आम्हाला यश मिळाले नाही.

सलग सात वर्षे मनोहरला विरोधी पक्षनेता म्हणून काम करावे लागले. या कालावधीत त्याला दररोज भेटण्यास येणाऱ्यांची संख्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांपेक्षा जास्त असायची. यावरून त्याची लोकप्रियता आणि जनतेच्या हृदयात त्याला असलेले स्थान लक्षात येते. जादूची कांडी घेऊन प्रश्‍न सोडविण्याची ताकद असणारा आणि त्याने मनावर घेतले की अशक्‍य वाटणारे कामही शक्‍य होणार, असा लोकांचा विश्‍वास त्याच काळात दिसून येऊ लागला.

लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी तो आवश्‍यक कृतीही करायचा. समाजातील शेवटच व्यक्ती सुखी समाधानी झाली पाहिजे, हे सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे लोकांना सुखा-समाधानाचे दिवस बघायला मिळाले. यामुळे अनेकांचे भले झाले. त्याच्या जाण्यामुळे गोमंतकीयांचे व भाजपचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. 

२०१२ मध्ये सरकार स्थापन झाल्यावर पेट्रोलवरील कर कमी करणे, गृहआधार योजना सुरू करणे, संगणकांऐवजी लॅपटॉपचे वितरण सुरू करणे, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या रकमेत वाढ करणे, विद्यार्थ्यांना विनाव्याज आर्थिक मदत देणे, शैक्षणिक पायाभूत सुविधांसाठी, जुन्या बसगाड्या बदलासाठी योजना सुरू केली. समाजाच्या प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ मिळावा, याकडे त्याचा कटाक्ष असायचा. खाणकामावर बंदी आली तरी मनोहर डगमगला नव्हता. आर्थिक मर्यादा मान्य करूनही त्याने महसूल वाढीवर भर दिला. त्यातून योजना सुरूच ठेवल्या. सरकारसाठी अत्यंत कठीण काळ असतानाही धीरोदात्तपणे तो परिस्थितीला सामोरा गेला. त्याच्यात जबरदस्त आत्मविश्‍वास होता. भाजपला ख्रिस्ती समाज केव्हा जोडला गेला नव्हता. मात्र मनोहरने त्यांची मने जिंकली. त्या समाजापर्यंत भाजप नेण्याचे सारे श्रेय मनोहरला जाते. त्या समाजाचा विश्‍वास त्याने कमावला. मनोहर आपल्यात नाही हे सत्य स्वीकारणे म्हणजे हृदयावर दगड ठेवण्यासारखे आहे. तो जरी शरीराने आपल्यातून गेला असला तरी तो प्रत्येकाच्या मनामनांत आहे. त्याचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्याच्या आत्म्यास ईश्‍वर शांती देवो!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com