‘क्रीडाप्रेमी’ मनोहरभाई...: किशोर पेटकर

Manohar Parrikar
Manohar Parrikar

मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात दर्जेदार क्रीडा सुविधा उभ्या राहिल्या, त्या भावी पिढीसाठी दिशादर्शक आणि लाभदायी आहेत. १८ ते २९ जानेवारी २०१४ या कालावधीत गोव्यात लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले, त्याचे सारे श्रेय पर्रीकर यांनाच जाते. गोव्यात झालेली ही पहिलीच बहुराष्ट्रीय स्पर्धा ठरली. गोव्याला २००९ साली स्पर्धेचे यजमानपद मिळाले, पण तत्कालीन काँग्रेस सरकारने फक्त डोळेझाकच केली. २०१२ साली पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर आले आणि लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेच्या तयारीने गती घेतली, तरीही ही स्पर्धा लांबणीवर पडली. पर्रीकर यांनी स्पर्धेचे महत्त्व जाणत काही महत्त्वाचे प्रशासकीय बदल केले. त्यांना केशव चंद्र यांच्या रूपात कार्यतत्पर ‘आयएएस’ अधिकारी मिळाला व ही स्पर्धा पूर्णत्वास गेली. अनंत अडचणींवर मात करत केवळ पर्रीकर यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे १२ देशांची लुसोफोनिया स्पर्धा गोव्यात यशस्वी ठरली. 

बांबोळीत गोवा वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थलेटिक्‍स स्टेडिअम मोठ्या दिमाखात उभे आहे. थलेटिक्‍स स्टेडिअम बांबोळीत उभारण्याची संकल्पना पर्रीकर यांचीच. या स्टेडिअमवर आता केवळ मैदानी खेळच होतात असे नाही, तर हे बहुउद्देशीय क्रीडा संकुल बनले आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील एफसी गोवा संघासाठी हे सरावासाठी नियमित  मैदान बनले आहे. शिवाय १६ वर्षांखालील ब्रिक्‍स करंडक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धाही याच मैदानावर तीन वर्षांपूर्वी झाली होती. शिवाय १६ वर्षांखालील एएफसी कप स्पर्धा, संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे सामनेही बांबोळीच्या स्टेडिअमवर झाले आहेत. दूरदृष्टी बाळगून पर्रीकर यांच्या संकल्पनेतून उभे झालेले हे स्टेडिअम म्हणजे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीय क्रीडाक्षेत्रासाठी अमूल्य देणगी आहे. २०१४ च्या लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेसाठी कमी वेळेत हे देखणे स्टेडिअम उभे राहिले. २०१७ साली भारतात झालेल्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने गोव्यात आलेले ‘फिफा’चे शिष्टमंडळ सर्वसुविधायुक्त बांबोळीतील स्टेडिअम पाहून आश्‍चर्यचकित झाले. त्यांनी हे स्टेडिअम प्रमुख सराव केंद्र बनविले, तसेच एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेसाठी निवडले. बांबोळीतील स्टेडिअमवर नियमित सराव करणाऱ्या एफसी गोवामुळे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या महसुलातही वाढ झाली आहे, तसेच राज्यातील अन्य इनडोअर खेळांनाही या संकुलात आसरा मिळाला आहे.

ताळगाव पठारावरील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमचे श्रेयही पर्रीकर यांनाच जाते. हे स्टेडिअम फारच कमी अवधीत उभे राहिले. दोनापावला येथील पर्रीकर यांचे निवासस्थान या स्टेडिअमपासून अगदी जवळ. लुसोफोनिया स्पर्धेसाठी हे स्टेडिअम बांधले जात असताना पर्रीकर नियमित कामाची पाहणी करत. आज हे इनडोअर स्टेडिअम बहुउद्देशीय झाले आहे. केवळ क्रीडाक्षेत्रासाठीच नव्हे, तर ‘इफ्फी’चे उद्‌घाटन आणि समारोप सोहळा, विविध राजकीय पक्षांच्या सभांसाठीही हे इनडोअर स्टेडिअम वापरले जाते. गतवर्षी गोव्यात झालेली पहिली ग्रॅंडमास्टर बुद्धिबळ स्पर्धाही याच इनडोअर स्टेडिअममध्ये झाली होती. या इनडोअर स्टेडिअमच्या उद्‌घाटनप्रसंगी पर्रीकर यांनी सांगितले होते, ‘‘डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी हे महान देशभक्त होते. त्यांचे नाव गोव्यातील एकाही जागेला नाही. ते गोमंतकीयांच्या नेहमीच स्मरणात राहावेत, या उद्देशाने स्टेडिअमला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या देशभक्तीला ही मानवंदना आहे.’’

फुटबॉलला दिला न्याय
मनोहर पर्रीकर यांनी २६ मार्च २०१२ मध्ये राज्य विधानसभेत ऐतिहासिक घोषणा केली. फुटबॉल हा ‘राज्य खेळ’ असल्याचे त्यांनी जाहीर केले. गोवा मुक्तीला पन्नास वर्षे उलटून गेल्यानंतर या मातीतील लोकप्रिय फुटबॉलला ‘राज्य खेळ’ हा अधिकृत दर्जा अखेर मिळाला. त्याचे श्रेय अर्थातच मुख्यमंत्री पर्रीकर यांनाच जाते. फुटबॉल हा खेळ केवळ सासष्टी भागातच लोकप्रिय नाही, तर साऱ्या राज्यभरात रुजलेला आहे हे पर्रीकरांना सिद्ध करायचे होते. विद्यार्थिदशेत असताना पर्रीकर स्वतः पट्टीचे फुटबॉलपटू होते. या खेळाच्या प्रेमापोटी आपण राज्याला देणे आहोत, या भावनेने पर्रीकर यांनी केवळ फुटबॉलला ‘राज्य खेळ’ हा दर्जा दिला, तसेच गोवा फुटबॉल विकास मंडळाची (जीएफडीसी) स्थापना करून गोमंतकीय फुटबॉलमध्ये मोठी क्रांती केली आहे. आज ‘जीएफडीसी’चे कार्य संपूर्ण गोव्यात फोफावले असून बालवयातील शालेय फुटबॉलपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. ब्रह्मानंद शंखवाळकर व ब्रुनो कुतिन्हो हे गोव्याचे दोन अर्जुन पुरस्कारप्राप्त फुटबॉलपटू. त्यांच्याप्रमाणे, गोमंतकीय फुटबॉलपटू आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रकाशमान व्हावेत ही पर्रीकरांची इच्छा होती. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात गोव्याचे पाच ते सहा खेळाडू असावेत हे त्यांचे स्वप्न, त्याविषयी भाष्य ते प्रत्येक फुटबॉलविषयक कार्यक्रमात आग्रहाने करत.

राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने पर्रीकर यांनी सदैवच फुटबॉलला साथ दिलेली आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रीय साखळी स्पर्धेच्या तयारीसाठी साळगावकर स्पोर्टस क्‍लब, चर्चिल ब्रदर्स व वास्को स्पोर्टस क्‍लब यांना एकत्रित एक कोटी रुपयांचा निधी दिला होता. गतवर्षीही त्यांनी आय-लीग स्पर्धेतील एकमेव गोमंतकीय संघ चर्चिल ब्रदर्सला आर्थिक अनुदान दिले होते, त्यावेळी राजकीय मतभेदही दूर ठेवले होते. त्याबद्दल या संघाचा सर्वेसर्वा बाणावलीचे चर्चिल आलेमाव खुल्या दिलाने पर्रीकर यांचे आभार मानायचे. सासष्टीतील सत्ताधाऱ्यांनी फुटबॉलच्या लोकप्रियतेचा आपल्या सोयीनुसार वापर करून घेतला, पण पर्रीकर यांचे तसे धोरण नव्हते.

क्रीडापटूंचे कैवारी
पर्रीकर हे सच्चे क्रीडाप्रेमी. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या क्रीडाप्रेमापोटी गोव्यात क्रीडा संस्कृती रुजली होती, त्याच वाटेने पर्रीकर गेले. त्यांनी नेहमीच क्रीडाप्रेम जोपासले, क्रीडा संस्कृती राज्यात रुजावी यासाठी खतपाणी घातले. ते राज्यातील क्रीडापटूंचे कैवारी ठरले. राज्य क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर पुरस्कार २००२ ते २०१४ या कालावधीत रखडला, मात्र पर्रीकर यांनी २५ जानेवारी २०१८ रोजी पुरस्कारप्राप्त खेळाडूंना न्याय दिला. बारा वर्षांच्या कालावधीत २२ क्रीडापटूंना मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला, तर १९९८ ते २०१४ या कालावधीतील आठ क्रीडा प्रशासकांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान सोहळ्यात पर्रीकर यांनी २०१५ पासूनचे पुढील पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते, त्यादृष्टीने प्रक्रियाही सुरू झाली. 

राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने भरीव अर्थसाह्य त्यांनी क्रीडा क्षेत्रात ओतले. पर्रीकर यांचे गोमंतकीय क्रीडा क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय, विलक्षण आहे. त्यांची दूरदृष्टी अलौकिक ठरली आहे. वारंवार लांबणीवर पडलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात यशस्वीपणे घेणे हे त्यांचे स्वप्न होते, मात्र मागील वर्षभरापासून आजारपणामुळे त्यांना स्पर्धेच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे जमले नव्हते, तरीही भारतीय ऑलिंपिक असोसिएशनला (आयओए) त्यांनी निराश केले नव्हते. पर्रीकर यांच्या शब्दामुळेच ‘आयओए’ने वेळोवेळी गोव्यास मुदतवाढ दिली. लांबलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा येत्या नोव्हेंबरमध्ये गोव्यात अपेक्षित आहे. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे पर्रीकर यांना योग्य श्रद्धांजली ठरेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com