‘मनोहर’ ही दैवी देणगी : राजेंद्र आर्लेकर

Manohar Parrikar
Manohar Parrikar

कार्यकर्त्याला जीव कसा लावावा, हे मनोहरने आम्हाला शिकवले. प्रत्येक कार्यकर्त्याचा कौटुंबिक तपशीलही त्याला माहीत होता. कार्यकर्ता किंवा सहकारी एखाद्यावेळी चुकला आणि त्याने दुसऱ्यावेळी चांगली कामगिरी केली तर कौतुक करण्यास मागेपुढे न पाहणारा मनोहर ही भाजपला मिळालेली देणगी होती. चरित्र व चारित्र्य सांभाळणारा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यामुळे भाजपचे व गोव्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. मनोहरची कार्यपद्धती उल्लेखनीय होती. कुठलेही काम असू देत ते झोकून देऊन करण्याचा शिरस्ता त्याने अखेरच्या श्‍वासापर्यंत पाळला. आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याने समाजासाठी दिला. कार्यकर्ता व नेता म्हणून तो लोकांच्या चिरःकाल स्मरणात राहील. 
- राजेंद्र आर्लेकर, माजी सभापती

एकदा १९९९ मध्ये मी भाजपच्या बैठकीसाठी स्कूटरने वास्कोहून संध्याकाळी सात वाजता पणजीला येत होतो. गोवा वेल्हा येथे स्कूटर व पोलिसांची व्हॅन यांची टक्कर झाली. डोके व मान हेल्मेटमुळे बचावली. पूर्ण शरीर जखमांनी भरून गेले. तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्‍यकता होती. भूलतज्ज्ञ मिळत नव्हता. अशावेळी पर्वरीला जाऊन मनोहर डॉ. शैलजा कामत यांना घेऊन आला. त्यानंतर मला मुंबईला नेणे आवश्‍यक आहे का, याची विचारणा डीनकडे त्याने केली. मी बरा होईपर्यंत रात्रंदिवस तो चौकशी करायचा. लागेल ती मदतही तो करायचा. 

मनोहर माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मी, लक्ष्मीकांत पार्सेकर व श्रीपाद नाईक यांच्याकडे पक्षाचे काम सोपविले तेव्हा एका कल्पक, स्वच्छ नेतृत्वाच्या शोधात आम्ही होतो. ती व्यक्ती सुशिक्षीत, सुसंस्कारी व आयुष्यात स्थिरावलेलीही हवी, अशा आमच्या अटी होत्या. त्याच काळात मनोहरकडे ही जबाबदारी पक्षाने टाकली आणि त्याने पक्षाचे काम वाढवत नेले. माझा आणि त्याचा संबंध १९७०-७२ च्या दरम्यानचा. त्यावेळी आम्ही संघाचे काम करायचो. संघाच्या शाखेत, शिबिरात भेटणे व्हायचे. संघाचे कार्यक्रम ठरविताना होणाऱ्या बैठकांत आम्ही बऱ्याचदा एकत्र यायचो. त्यातून मैत्रीचा धागा जुळला. १९७५ मध्ये देशात आणीबाणी लादली गेली. त्यावेळी मनोहर मुंबईत होता, आम्ही कारावास भोगला. १९७७ पासून आमची जवळीक वाढली. त्यावेळी मी संघाचा मुंबईत प्रचारक होतो. १९८०-८१ च्या दरम्यान, गोव्यात परतल्यानंतर भाजपचे काम पाहू लागलो. मनोहरही संघाचे काम करत होता. त्यामुळे कामानिमित्त एकमेकांच्या घरी ये-जा असायची. मनोहर अपघाताने राजकारणात आला, असे म्हणायचा. ते खरेही होते. सुरवातीच्या काळात भाजपचे काम करताना दोनच गाड्या होत्या, एक मनोहरची दुसरी श्रीपादची. खरेतर व्यवसायाच्या गरजेसाठी त्यांनी त्या गाड्या घेतल्या होत्या. मात्र, त्यांचा वापर पक्षाच्या कामासाठीच जास्त होत होता. त्या दोन्ही गाड्यात मावणारेच आम्ही नेते होतो. त्या काळी राज्यात दौरे करणे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे, हा कार्यक्रम असायचा. एखाद्या बैठकीस कोणी कार्यकर्ता उपस्थित राहिला नाही तर त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन विचारपूस करण्यात मनोहरचा पुढाकार असायचा. कार्यकर्त्यांत रमणारा नेता होता तो. आजारी असतानाही तो संपर्कात असायचा. लोकांशी संवाद साधल्यावर काम करण्यास हुरूप येतो, असे तो म्हणायचा. सुरवातीपासूनच त्याच्या या स्वभावामुळे तो कार्यकर्ते जोडत गेला, त्याचा फायदा भाजपला झाला. समाजातल्या सर्व स्तरातून कार्यकर्ते हेरण्याची गुणग्राहकता त्याच्याकडे होती. त्यामुळे पक्षाची मोठी फळी गोव्यात तो तयार करू शकला. पक्षात त्याने आमदार झाल्यापासून कोणतेही पद स्वीकारले नव्हते. मात्र, पक्षाच्या कामावर त्याचे नेहमीच लक्ष असे.

त्याचे कार्यकर्त्यांकडे किती लक्ष असायचे याचे एक उदाहरण म्हणजे, पाटो येथील मैदानावर पक्षाचे अधिवेशन होते. त्यावेळचे ते मोठे अधिवेशन होते. हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मनोहर व्यासपीठावर होता. दुपारी जेवणाच्यावेळी मंडपाच्या एका कोपऱ्यात कार्यकर्त्यांची गैरसोय होत आहे, हे त्याच्या नजरेने टिपले. त्याने तडक जावून जेवण वाढण्याची भूमिका स्वतःकडे घेतली. यामुळे होणारा मोठा गोंधळ टळला. कितीही कामात असला तरी सभोवतालच्या वातावरणाचे भान त्याला असायचे. हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत तो स्वस्थ बसायचा नाही. त्याचा हायड्रॉलिक प्रेसचा व्यवसाय होता. त्यावेळी सुटे भाग मिळत नव्हते ते त्वरित हवे असल्यास तो स्वतः ‘जावा’ मोटारसायकलवरून दोनवेळा मुंबईत जाऊन आला होता, हे आता कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. हाती घेतलेले काम पूर्ण करेपर्यंत त्याला चैन पडत नसायचा. त्याचाच फायदा राज्याचे प्रशासन चालवताना त्याला झाला. एरव्ही शेवटचा शेरा वाचून मंत्री त्यावर स्वाक्षरी करतात, शेरा मारतात. मनोहर याला मात्र अपवाद होता. कोणतीही फाईल असू दे तो मुळापासून वाचून विषय समजून घेणार. त्याच्या या सवयीमुळे सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांना तो त्यांच्या चुका दाखवू शकत होता. तो अभ्यासू होता. दीर्घकाळ तो वाचन करी. वाचनासाठी तो वेळ कधी काढतो, हे अनेकांना समजत नव्हते. आपले ज्ञान सातत्याने नवे असले पाहिजे, असे तो म्हणायचा. कार्यकर्त्याला जीव कसा लावावा, हे त्याच्याकडूनच शिकावे. प्रत्येक कार्यकर्त्याचा कौटुंबीक तपशीलही त्याला माहिती होता. कार्यकर्ता किंवा सहकारी एखादेवेळी चुकला आणि त्याने दुसऱ्यावेळी चांगली कामगिरी केली तर कौतुक करण्यासही मागेपुढे पाहत नव्हता. मनोहर ही भाजपला मिळालेली देणगी होती. त्याच्या जाण्यामुळे भाजपचे व गोव्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. ईश्‍वर त्याच्या आत्म्यास शांती देवो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com