गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होणार आज ?

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होणार आज ?

पणजी : काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्ली गाठली खरी मात्र राज्याच्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी दिल्लीतच घडत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्रिपदी कोण याचा निर्णय घेणार अाहेत, अशी माहिती मिळाली आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत हे काल रात्री दिल्लीला रवाना झाले असून, आरोग्यमंत्री विश्वजित राणे दिल्लीतच आहेत. या दोघांपैकी एकाची निवड मुख्यमंत्री म्हणून होऊ शकते.

शहा यांनी काल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलावले होते. शहा अन्य कामांत व्यस्त राहिल्याने काल ही बैठक झाली नाही. ती आता आज होणार आहे. दरम्यानच्या काळात शहा यांच्याकडून बोलावणे आल्याने डॉ. सावंत आणि त्यानंतर उपसभापती मायकल लोबो हेही दिल्लीला रवाना झाले आहेत. मनोहर आजगावकर, जयेश साळगावकर, दीपक प्रभू पाऊसकर आणि विनोद पालयेकर हेही दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

डॉ. सावंत यांचे वडील पांडुरंग हे जनसंघाने नेते होते. त्यांनी पाळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. डॉ. सावंत किशोरवयीन असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवरही जात असत. ते स्वयंसेवक आहेत.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या अनुपस्थितीत ध्वजारोहणाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवत आपला त्यांच्यावर किती विश्वास आहे, हे दाखवून दिले होते. दुसरीकडे विश्वजित राणे यांनी काँग्रेसचे दोन अामदार फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापुढेही ते राजकीय फेरआखणी करण्यात भाजपला मदत करू शकतात. आरोग्य खात्याची विस्कटलेली घडी राणे यांनी व्यवस्थित बसवून व्यवस्थापन कौशल्याचा परीचय करून दिला आहे. त्यांचे वडील प्रतापसिंह हे अनेकवर्षे मुख्यमंत्री होते. त्यामुळे प्रशासन त्यांनी जवळून पाहिले आहे. या दोघांतून शहा कोणाची निवड करतात ते आज ठरणार आहे.

भाजपची बैठक वादळी

भाजप गाभा समितीची पक्ष कार्यालयात काल झालेली बैठक वादळी झाली. कॉंग्रेसच्या दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या या बैठकीत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या दोघांच्या येण्याने पक्षाला काय लाभ होणार असा थेट प्रश्न उपस्थित केला.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून निर्णय घेण्याची संस्कृती भाजपने केव्हापासून अंगीकारली अशी विचारणा माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी केली तर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी अशा कृतीने पक्षाचे काही भले होणार नाही असा इशारा दिला.

प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, सदानंद शेट तानावडे, अॅड नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर, संघटन सचिव विजय पुराणिक या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत बदलत्या राजकीय परीस्थितीवर चर्चा करून संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्याचे नियोजन होते. मात्र, पार्सेकर यांनी आप आक्रमक भूमिका घेतली. पक्षात कोणत्याही नेत्यावर प्रवेश देता येतो , मात्र ते करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. तसे का केले जात नाही, अशी विचारणा करून केवळ राष्ट्रीय अध्यक्षांचे निरोप पोचविण्यापूरतीच प्रदेशाध्यक्षांची भूमिका मर्यादित केव्हापासून झाली, अशी विचारणाही त्यांनी केली. आर्लेकर यांनी यातून घातक पायंडा पडत असल्याकडे लक्ष वेधले. उपाध्यक्ष खोलकर यांनाही यावेळी काही प्रमाणात टीका झेलावी लागली, अशी माहिती मिळाली आहे.

नव्या समीकरणांची शक्यता

गोवा फॉरवर्डमधील जयेश साळगावकर व विनोद पालयेकर तर मगोतील मनोहर आजगावकर  हे मंत्री आणि गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक प्रभू पाऊसकर यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. कारण गोवा फॉरवर्ड व मगोचे प्रत्येकी तीन आमदार असल्याने दोघे फुटल्यास ते दोन तृतायांश ठरतात. या पळवाटेचा उपयोग केला जाण्याची शक्यता चर्चेत आहे. भाजप की कॉंग्रेससाठी ही तरतूद लाभदायक ठरेल हे आताच सांगता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या भूमिकेवर सारेकाही अवलंबून असल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com