मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे विरोधकांना असेही उत्तर

अवित बगळे
रविवार, 16 डिसेंबर 2018

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि मंत्रिंमंडळ बैठकीवेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची एका बाजूने घेतलेली छायाचित्रे प्रसारीत केल्याने त्यांच्या आरोग्याविषयी शंका घेतली जात होती. काल मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसारीत करण्यात आलेल्या छायाचित्रात मुख्ममंत्री उभे दिसत असून ते फलकाचे अनावरण करत आहेत असे दिसत आहे. ते कमालीचे थकल्याचेही या छायाचित्रावरून जाणवते. कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु ठेवले असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत कशी आहे याविषयीच्या चर्चेला आणखी विराम देताना मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या खासगी निवासस्थानी कुंकळ्ळी येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या संकुलाची कोनशीला बसवल्याच्या नामफलकाचे अनावरण केले.

यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, संस्थेचे प्राचार्य गोपाळ मुगेराय, दक्षिण गोव्याचे खासदार अॅड नरेंद्र सावईकर, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, कुंकळ्ळीचे माजी आमदार सुभाष ऊर्फ राजन नाईक आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी उपेंद्र जोशी उपस्थित होते.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि मंत्रिंमंडळ बैठकीवेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची एका बाजूने घेतलेली छायाचित्रे प्रसारीत केल्याने त्यांच्या आरोग्याविषयी शंका घेतली जात होती. काल मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसारीत करण्यात आलेल्या छायाचित्रात मुख्ममंत्री उभे दिसत असून ते फलकाचे अनावरण करत आहेत असे दिसत आहे. ते कमालीचे थकल्याचेही या छायाचित्रावरून जाणवते. कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु ठेवले असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे.

कुंकळ्ळी येथे १२ एकरात एनआयटीचे संकुल दोन वर्षात आकाराला येणार आहे. त्यासाठी ४ लाख ५६ हजार ७६७ चौरस मीटर जमीन राज्य सरकारने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला हस्तांतरीत केली आहे. या मंत्रालयाने संकुलाच्या पहिल्या टप्प्यासाठी ४९७ कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. या संकुलाला ७ किलोमीटर परीघात भिंतीचे कुंपण घालण्यात येणार आहे. त्याशिवाय कॉंक्रीटच्या ठोकळ्यांच्या आधारे इमारती बांधल्या जातील, त्यांना खांब नसतील शिवाय भिंतींना गिलावाही केला जाणार नाही. हे सर्व संकुल सौर ऊर्जेवर चालेल. संकुल पूर्ण झाल्यावर या संस्थेत १ हजार २६० विद्यार्थ्या्ंना प्रवेश दिला जाणार असून ४० टक्के जागा गोमंतकीय विद्यार्थ्या्ंना आरक्षित असतील.

Web Title: Goa CM Manohar Parrikar participate in event