गोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे

अवित बगळे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसने नेटाने प्रयत्न चालवले होते. कॉंग्रेसचे राज्य प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांनी गोव्यातच तळ दिला होता. आमदार एकत्र रहावेत यासाठी दर दोन दिवसांनी विधीमंडळ गटाची बैठक घेण्यात येत होती.

पणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याचिका सादर करणाऱ्या काँग्रेसचा आज स्वप्नभंग झाला. मांद्रेकर मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे व शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे नक्की केल्याने सरकार स्थापन करण्याचे काँग्रेसचे स्वप्न हवेतच विरले आहे.

सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसने नेटाने प्रयत्न चालवले होते. कॉंग्रेसचे राज्य प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांनी गोव्यातच तळ दिला होता. आमदार एकत्र रहावेत यासाठी दर दोन दिवसांनी विधीमंडळ गटाची बैठक घेण्यात येत होती. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यासाठीच्या सभेपूर्वी चार हजार जणांच्या सहभागाने मोठा मोर्चा काढून कॉंग्रेसने शक्तीप्रदर्शनही केले होते. मात्र भाजपने दोन आमदारांना आपल्याकडे वळवून कॉंग्रेस सत्तेपर्यंत पोचू शकणार नाही याची दक्षता घेतली आहे.

या दोन्ही आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा सभापतींकडे सादर केले असून त्या आमदारांशी व्यक्तीशः बोलून खातरजमा केल्यानंतर सभापतींनी ते राजीनामे स्वीकारले आहेत. हे दोन्ही आमदार दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये सायंकाळी पाच वाजता प्रवेश करणार आहेत. मात्र कॉंग्रेसकडून आमदार आयात करणे सुरु केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

Web Title: Goa Congress lawmakers Dayanand Sopte and Subhash Shirodkar resigned from the party after meeting BJP chief Amit Shah