विरोधकांच्या अपप्रचाराला जनतेनेच उत्तर दिलं- मनोहर पर्रीकर

अवित बगळे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पणजी : विरोधकांनी मला व विश्‍वजित राणे यांना लक्ष्य करून वैयक्तिक टीका केली. आजच्या विजयाने त्या टीकेला आणि अपप्रचाराला जनतेनेच उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रीया पणजीतील भाजपचे विजयी उमेदवार आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले. सरकारचे स्थैर्य आणि विकासावर हे शिक्कामोर्तब आहे असेही ते म्हणाले.

पणजी : विरोधकांनी मला व विश्‍वजित राणे यांना लक्ष्य करून वैयक्तिक टीका केली. आजच्या विजयाने त्या टीकेला आणि अपप्रचाराला जनतेनेच उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रीया पणजीतील भाजपचे विजयी उमेदवार आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले. सरकारचे स्थैर्य आणि विकासावर हे शिक्कामोर्तब आहे असेही ते म्हणाले.

विजयानंतर भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासोबत वाळपईतील विजयी उमेदवार आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, सरचिटणीस खासदार ऍड नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, खजिनदार सुनील देसाई आदी होते.
मुख्ममंत्री म्हणाले, मला अंदाजापेक्षा केवळ 138 मते कमी मिळाली. मतदान केंद्रावर सरासरी 4-5 मते कमी मिळाली. गणेश चतुर्थीच्यानिमित्ताने लोक शहराबाहेर गेल्याने आधीच 7 टक्के कमी मतदान झाले होते. त्यात आमचे काही हक्काचे मतदार पणजीबाहेर गेल्याने ही 138 मते कमी मिळाली. या खेपेला कधी नव्हे तो विखारी प्रचार विरोधकांकडून पहावयास मिळाला, मिळेल ते व्यासपीठ त्यासाठी त्यांनी वापरले, समाज माध्यमे असू दे वा सत्यशोधन अहवाल असू दे सर्वाचा वापर आमच्याविरोधात प्रचारासाठी केला गेला. असत्य पसरविण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. आज मतमोजणीतून या साऱ्याला पूर्णविराम मिळेल अशी आशा आहे.

विरोधकांनी ना ना तऱ्हेची नाटके केली तरी जनतेने त्याना सपशेल नाकारले असे नमूद करून ते म्हणाले, येथे सर्वधर्मसमभाव आहे, चतुर्थीला हिंदूच्या घरी मुस्लीम व ख्रिस्ती लोक येतात. ईदला सर्वजण जातात तसेच नाताळच्याबाबतीतही आहे. मात्र काहींनी धर्माच्या नावाने मतदारांत फूट घालण्याचा अनिष्ट असा प्रयत्न केला. त्यालाही मतदारांनी जोरदार चपराक लगावली आहे. दुहीची बिजे समाजात पेरू इच्छीणाऱ्यांना येथे स्थान नाही असा संदेशही या निवडणुकीतून सर्वदूर गेला आहे. मात्र भविष्यात असे प्रकार होऊ शकतात यासाठी दक्ष रहावे लागेल हा संदेश आम्ही यातून घेत आहोत.
आपण मुख्यमंत्रीपदी राहून राज्याचा विकास साधावा की नको याचा निर्णय पणजीतील जनतेकडून अपेक्षित होता असे सांगून ते म्हणाले, पणजीतील जनतेने मी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा विकास करावा असा निर्णय दिला आहे. पुढील वर्षभरात पणजीतील ठळक समस्या निकाली काढण्यासाठी आश्‍वासनाप्रमाणे काम करणार असून राज्याचा सर्वांगीण विकास विशेषतः रोजगार निर्मितीवर येणाऱ्या काळात भर असेल.
काँग्रेसमधील आणखीन कोणी आमदार भाजपमध्ये येणार का या प्रश्‍नावर ते म्हणाले, 23 जणांचा आमचा सुखी संसार आहे (भाजप 14, मगो 3, गोवा फॉरवर्ड 3, अपक्ष 3) त्यात आणखीन सवत आणून सुखी संसाराला आम्हाला गालबोट लावायचे नाही.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले, मला मोठे मताधिक्‍य मिळाले याचे कारण जनतेने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करण्यासाठी याखेपेस मतदान केले. मतदारसंघात मुस्लीम समाजही मोठ्या प्रमाणावर आहे त्यांनीही याखेपेस भाजपला मतदान केले. ही मते विकासासाठी त्यांनी दिली असे मी मानतो.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

 

 

Web Title: goa elections news manohar parrikar bjp