गोवा-कर्नाटक महामार्ग दरड कोसळल्याने बंद!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

फोंडा : वास्को - खानापूर  महामार्गावर केरये - खांडेपार येथे दरड कोसळल्यामुळे गोवा कर्नाटक महाराष्ट्र महामार्ग क्रमांक ४ अ कालपासून आठवडाभरासाठी बंद पडला आहे. पुणे बंगळूर महामार्गाचा एक फाटा खानापूरहून गोव्यात येतो. सध्या अन्य तीन पर्यायी रस्त्यांवरुन महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

फोंडा : वास्को - खानापूर  महामार्गावर केरये - खांडेपार येथे दरड कोसळल्यामुळे गोवा कर्नाटक महाराष्ट्र महामार्ग क्रमांक ४ अ कालपासून आठवडाभरासाठी बंद पडला आहे. पुणे बंगळूर महामार्गाचा एक फाटा खानापूरहून गोव्यात येतो. सध्या अन्य तीन पर्यायी रस्त्यांवरुन महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

हा रस्ता धोकादायक ठरल्याने सर्व वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. चौपदरी रस्त्याच्या कामातील नियोजनशून्यतेचा प्रत्यय पहिल्याच पावसात दिसून आला. रस्ता रुंदीकरणावेळी डोंगर उभा कापल्यामुळे ही स्थिती उद्‌भवली आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी अचानकपणे सर्व वाहतूक वळवण्यात आल्यामुळे प्रवासी वर्गाची प्रचंड गैरसोय झाली. सध्या दरड कोसळलेल्या ठिकाणी माती हटवणे व डोंगर कापणीचे काम सुरू असून हा महामार्ग आणखी किती दिवस बंद राहील, हे सांगणे कठीण असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या महामार्गावर मोठ्या मालवाहू ट्रकांची वर्दळ असते. ही वाहतूक गावांतील रस्त्यावरून वळविण्यात आल्याने गावांतील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

कुर्टी येथील चौपदरी रस्त्याच्या कामावेळी डोंगराचा एक भाग कापण्यात आला होता. मात्र यावेळी कोणतीच खबरदारी घेण्यात आली नाही. डोंगर उभा कापल्यामुळे खांडेपार येथील चर्च ते सोमनाथ देवालयापर्यंतचा भाग धोकादायक ठरला होता. पहाटे या डोंगराचा काही भाग रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक खोळंबली. त्यानंतर रस्त्यावरील माती हटवून वाहतूक मोकळी करण्यात आली असली तरी संध्याकाळी पुन्हा एकदा दरड कोसळल्यामुळे वाहनचालकांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी या महामार्गावरील सर्वच वाहतूक बंद करण्यात आली. दरड कोसळल्यानंतर फोंड्याचे उपजिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, फोंड्याचे मामलेदार तसेच वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीण गावस, हरीष मडकईकर व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच एमव्हीआर या रस्ता कामाच्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत परिस्थितीची पाहणी केली. 

दरडीची माती हटवणे तसेच या महामार्गावर आणखी दरड कोसळू नये यासाठी डोंगराचा काही भाग कापणे आवश्‍यक असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे आवश्‍यक ठरले होते. तशी मागणी एमव्हीआर या कंत्राटदार कंपनीने केल्यामुळे वाहतूक वळवण्यासाठी वाहतूक निरीक्षकांनी फोंड्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन कुर्टी - खांडेपार महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून इतर मार्गाने वळवण्यासंबंधी आदेश काढण्याची मागणी केली. या निवेदनानुसार दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी कुर्टी - खांडेपार महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात यावी यासाठी आदेश जारी केला आहे. 

वाहतुकीसाठी आता तीन मार्ग!
फोंड्याहून खांडेपार मार्गे उसगावला जाण्यासाठी आणि उसगावहून फोंड्याला येण्यासाठी वाहतूक फोंड्यातून सावईवेरेमार्गे खांडेपार तर खांडेपारहून ओपा, कोडार, बेतोडा मार्गे फोंडा व तिसरा पर्याय म्हणून फोंडा, बेतोडा, धारबांदोडा ते तिस्क उसगाव किंवा मोले अशी वाहतूक वळवण्यात आली आहे. खांडेपारहून फोंड्याच्या केवळ दहा मिनिटांच्या मार्गासाठी आता प्रवाशांना तीस ते चाळीस मिनिटांचा वेळ खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे काखेला कळसा अन्‌ गावाला वळसा असा प्रकार खांडेपार येथील दरड कोसळल्यामुळे घडला आहे.

विद्यार्थी, कामगारांचे हाल!
कुर्टी - खांडेपार महामार्ग बंद केल्यामुळे पाळी, बाराजण, तिस्क - उसगाव, धारबांदोडा भागातून फोंड्याला येणारे विद्यार्थी तसेच कामगारांचे अतिशय हाल होणार आहेत. संध्याकाळी अचानकपणे वाहतूक वळवल्यानंतर या लोकांना गावाला वळसे घालत आणि वाहतूक कोंडी सोडवत घर गाठावे लागले. खांडेपार - केरये येथील या दरडीचे काम युद्ध पातळीवर हाती घेऊन कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

Web Title: goa karnataka high way close because of landslide