गोव्याला ज्ञानाच्या क्रांतीची गरज - मनोहर पर्रीकर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

शिक्षण केवळ माहिती देते, ज्ञानासाठी आणखीन पुढे जावे लागते. अशा ज्ञानाधारित समाजाच्या निर्मितीच्या क्रांतीची ज्योत पेटविण्याची गरज आहे. ज्ञानाधिष्ठित, सुदृढ गोव्याच्या निर्मितीचे लक्ष्य आहे. 
- मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा 

 

पणजी: डॉ. राममनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगावात गोव्याच्या क्रांतीची ज्योत पेटवली तरी ती क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही. गोमंतकीय समाजाचे रूपांतर ज्ञानाधिष्ठित समाजात करण्याच्या क्रांतीची आज गरज आहे, असे उद्‌गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज पणजीत काढले. 

गोवा क्रांती दिनाच्या 72 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. राज्यपाल डॉ. मुदुला सिन्हा व मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्रे वाहिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 72 वर्षांपूर्वी क्रांतीची मशाल पेटवली गेली, स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा त्याग केला. त्यामुळे आज हे दिवस सगळ्यांना पाहावयास मिळाले. मात्र, हा लढा पूर्ण झालेला नाही. स्थलांतरितांची मालमत्ता असलेल्या मये गावाचा प्रश्न सुटलेला नाही, तो साडविण्यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्न करेन. प्लॅस्टीकमुक्त गोवा मोहीमही नेटाने चालविण्यात येईल. "घराघरांत आपल्या पूर्वजांनी काय उत्तम, उदात्त केले याच्या कहाण्या सांगितल्या जातात. तशा या क्रांतिकारकांच्या कहाण्या नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी त्यांचा समावेश पाठ्यपुस्तकांत तर केला पाहिजेच, शिवाय घराघरांत त्या सांगितल्या पाहिजेत. सुंदर, स्वच्छ व सुदृढ गोव्याच्या निर्मितीसाठी असे करणे आवश्‍यक आहे,' असे मत राज्यपाल सिन्हा यांनी व्यक्त केले. 

शिक्षण केवळ माहिती देते, ज्ञानासाठी आणखीन पुढे जावे लागते. अशा ज्ञानाधारित समाजाच्या निर्मितीच्या क्रांतीची ज्योत पेटविण्याची गरज आहे. ज्ञानाधिष्ठित, सुदृढ गोव्याच्या निर्मितीचे लक्ष्य आहे. 
- मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा 

 

Web Title: Goa needs knowledge revolution says Manohar Parrikar