Exclusive: असल्या राजकारणापेक्षा जनतेला हवाय विकास- पर्रीकर

अवित बगळे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

जनतेला आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात कधीच रस नसतो. जनतेला विकास हवा असतो. त्यासाठी सक्षम नेतृत्व हवे हेही जनता जाणते. त्याचमुळे भाजपचे विधानसभेचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी जनतेने विजयी केले. हा विजय आम्हाला अपेक्षितच होता, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे 'गोमंतक'ला सांगितले.

विजयी घोषित झाल्यानंतर मनोहर पर्रीकर लगेच भाजपच्या कार्यालयाकडे निघाले. त्या दरम्यान त्यांच्याशी झालेला संवाद असा.
प्रश्‍न : मिळालेल्या मताधिक्‍याने समाधानी आहात?
पर्रीकर : मताधिक्‍य अपेक्षितच होते. मी कधीही 7-8 हजार मताधिक्‍य मिळेल असे म्हटले नव्हते. प्रचारावेळी काही आकडे सांगितले जातात. तो प्रचार तंत्राचा भाग असतो. प्रचारावेळी अनेकजण बोलत असतात. त्यामुळे मी अपेक्षित धरलेले मताधिक्‍य मला मिळाले असे मला वाटते. समाधानी म्हणाल तर मला विजय अपेक्षितच असल्याने त्यात आणखीन समाधानी होण्याची बाब ती कोणती?

प्रश्‍न : या निकालानंतर सरकारचे स्थैर्य वाढले असे वाटते का?
पर्रीकर : सरकार स्थिर होते व राहील. हा प्रश्‍न स्थैर्याचा नव्हता. मी संरक्षणमंत्रीपदी होतो. पक्षाने मला तेथे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नेले होते. पक्षानेच मला परत मुख्यमंत्रिपदी पाठवले. मागच्या खेपेला हाती घेतलेली अनेक कामे नंतरच्या काळात पूर्ण झालेली नव्हती. ती पूर्ण करण्यासाठी हुरूप यावा लागतो. मला वाटते आजच्या निकालाने मला तो हुरूप पुन्हा मिळवून दिला आहे.

प्रश्‍न : निवडणूक काळात तुमच्या विरोधात मोठा प्रचार झाला. त्याला उत्तर काही तुम्ही दिले नव्हते...
पर्रीकर : मी पणजीतील भाजपचा उमेदवार होतो आणि मुख्यमंत्रीही होतो. त्यामुळे डोक्‍यावर बर्फ ठेऊन काम करत होतो. संयम बाळगत होतो. संरक्षणमंत्रीपदी वावरताना तोंड बंद कसे ठेवावे याचे शिक्षण मला नकळतपणे मिळाले होते. त्याचा वापर केला. मला ठाऊक होते की जनता अशा अपप्रचाराला जराही थारा देणार नाही. तेच आज दिसून आले.

प्रश्‍न : तुमच्या विरोधात कॉंग्रेसने उमेदवार दिला आणि तुम्हाला प्रचारात गुंतवून ठेवले त्याचा फटका राज्याच्या विकासासाठी तुम्ही देऊ शकत असलेल्या वेळेला बसला असे वाटत नाही?
पर्रीकर : आमचे सरकार आहे व राहणार हे ठाऊक असूनही ते माझ्याविरोधात उमेदवार न ठेवण्याचा मनाचा मोठेपणा कॉंग्रेस दाखवणार नाही हे मला पुरेपूर ठाऊक होते. कोणी म्हणेल मला याखेपेला पणजीत नेटाचा प्रचार करावा लागला पण वस्तुस्थिती सांगतो एरव्ही सगळ्या निवडणुकीसोबत पणजीची निवडणूक होत असे. त्यामुळे साहजिकपणे 32-33 मतदारसंघातील प्रचारात मी गुंतलेला असे. याखेपेला वाळपई मतदारसंघात एक दोन दिवस वगळता मी गेलो नाही. त्यामुळे हाती असलेला वेळ पणजीवासियांशी संवाद साधण्यासाठी वापरला.

प्रश्‍न : प्रमुख विरोधी उमेदवार गिरीश चोडणकर यांनी चांगली लढत दिली असे वाटत नाही?
पर्रीकर : पणजी मतदारसंघात कॉंग्रेसची साडेचार हजार मते हक्काची आहेत. तेवढी मते त्यांनी मिळवली. विरोधासाठी त्यांच्याकडे मुद्दे नसूनही त्यानी लढत दिली. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने त्यांनी फातोर्ड्यातून पणजीत येऊन निवडणूक लढविली. माझा विजय निश्‍चित असल्याने त्यांनी काय प्रचार चालवला आहे याच्यावर नजर ठेऊन प्रत्युत्तर देण्यात मी वेळ खर्ची घातला नाही. त्यांनी निश्‍चितपणे अपप्रचार केला. आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.

प्रश्‍न- आता लक्ष्य केवळ पणजीचा विकास?
पर्रीकर : पणजीचा आमदार या नात्याने पणजीचा विकास हा करणारच. आधीच अमृत योजना असो वा स्मार्ट सीटी. या माध्यमातून विकासाचा आराखडा तयार केला आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे पणजी शहर येत्या चार वर्षात तयार होणार आहे. त्याचा बृहद आराखडा तयार झालेला आहे. त्या कामाला आता गती देणार आहे. प्रचारादरम्यान जनसंवादातून अनेक समस्यांची माहिती मला झाली आहे. कालबद्ध पद्धतीने त्या समस्या दूर करणार आहे. केवळ पणजीचा विकास हे ध्येय कधीच नव्हते राज्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय आहे.

प्रश्‍न : भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर केलेल्या आघाडी सरकारच्या बाजूने हे मतदान आहे असे मानावे का?
पर्रीकर : विधानसभा निवडणुकीनंतर गोवा फॉरवर्ड, मगो आणि तीन अपक्ष आमदार भाजपसोबत आले. मी मुख्यमंत्रीपदी हवा अशी त्यांची पूर्वअट होती. संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी त्यावेळी होती. त्याचवेळी या पाठींबा देणाऱ्या पक्षांची अट मान्य करून मला भाजपने पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाठवले. जनता याकडे कसे पाहते याचाही निर्णय या निवडणुकीतून होणार होता हे खरे आहे. आम्ही त्याचे उत्तर जनतेला मतदानापूर्वीच दिले होते. सर्व घटक पक्षांनी एकत्रित सभा संबोधित करून आम्ही केवळ सत्तेसाठी एकत्र नाही तर निवडणुकाही एकत्रित लढतो हे दाखवून दिले. जनतेनेही भरघोस मतदान करून आम्हाला निर्धास्त केले आहे.

प्रश्‍न : राज्यसभेचे सदस्यत्व कधी सोडणार?
पर्रीकर : मुख्यमंत्रीपदी मी परत आल्यावर राज्यसभेचे सदस्यत्व सोडलेले नव्हते. ते पद कधी सोडावे याचा निर्णय बहुअंशी पक्षीय पातळीवर घेतला जातो. राज्यसभेतील पक्षीय बलाबलाशी तो निर्णय निगडीत असतो. राष्ट्रपतीपद व उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक मध्यंतरी होती. त्या निवडणुकीत मला मतदान करण्याची संधी मी राज्यसभेचे सदस्यत्व न सोडल्यानेच मिळाली. आता पक्ष नेतृत्वाला कल्पना देत येत्या 15 दिवसांच्या आत राज्यसभेचे सदस्यत्व सोडणार आहे.

प्रश्‍न : राज्यभरातील जनतेसाठी काही संदेश?
पर्रीकर : जनतेने आमच्यावर विश्‍वास दाखवल्याबद्दल जनतेचे आभार. आता पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार आहे. विकास करताना आम्ही कधी मतदारसंघ विरोधकांचा की सत्ताधाऱ्यांचे हे पाहिलेले नाही, कारण विकासाचे फायदे हे जनतेला मिळत असतात. पुढील पाच वर्षे आता केवळ राज्याचा विकास हेच ध्येय आहे. कोणीही कितीही अपप्रचार केला तरी जनतेने त्यावर विश्‍वास ठेऊ नये हे सरकार स्थीर असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार आहे.

Web Title: goa news by election manohar parrikar exclusive interview