जगभरातील संशोधकांसमोर खोट्या माहितीचे आव्हान

अवित बगळे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पणजीत देशभरातील विद्यार्थ्यांशी नोबेल पुरस्कार विजेत्यांनी साधला संवाद

पणजी (गोवा): जगभरातील संशोधकांसमोर नव्या संशोधनाचे नव्हे तर आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध होत असलेल्या खोट्या आणि फसव्या माहितीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम संशोधनावर होतो, बऱ्याचदा माहिती खोटी होती हे नंतर लक्षात येते आणि कालहरण होते, अशी खंत नोबेल पुरस्कार विजेते सर्ज हर्चेस यानी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केली.

पणजीत देशभरातील विद्यार्थ्यांशी नोबेल पुरस्कार विजेत्यांनी साधला संवाद

पणजी (गोवा): जगभरातील संशोधकांसमोर नव्या संशोधनाचे नव्हे तर आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध होत असलेल्या खोट्या आणि फसव्या माहितीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम संशोधनावर होतो, बऱ्याचदा माहिती खोटी होती हे नंतर लक्षात येते आणि कालहरण होते, अशी खंत नोबेल पुरस्कार विजेते सर्ज हर्चेस यानी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केली.

देशभरातून आलेल्या विज्ञान विषयाच्या निवडक विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. केंद्र सरकारचे जैव तंत्रज्ञान मंत्रालय, गोवा सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान खाते आणि स्वीडनच्या नोबेल मिडीयाने या संवाद कार्यक्रमाचे आयोजन आज पणजीतील कला अकादमीत केले होते. यावेळी नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष कार्ल हेन्रीक हेल्डीन, नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्टस्‌, ख्रिस्तीन नुस्ले वोलहार्ड, तोमस रॉबर्ट लिंडहाल, नोबेल मिडीयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मातीयास फिरेनिस आणि केंद्र सरकारचे जैव तंत्रज्ञान सचिव विजय राघवन उपस्थित होते. फिरेनिस आणि राघवन यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

हर्चेस म्हणाले, संशोधन करताना कुणीतरी मार्गदर्शक वा शिक्षक असावा लागतो, कारण कोणती माहिती खरी आहे आणि कोणती खोटी याची शहानिशा करताना अशा मार्गदर्शकाची भूमिका मोलाची ठरते. संशोधन करताना इतर कोण त्या विषयावर संशोधन करत आहेत याचेही भान ठेवावे लागते. एखादा संशोधक संशोधित करत असलेली गोष्ट दुसऱ्याने शोधून काढली तर त्या संशोधकाला लगेच दुसऱ्या गोष्टीकडे वा त्यापुढील संशोधनाकडे वळता येते. मात्र आंतरजालावर याविषयी मिळत असलेली माहिती खात्रीलायक असेलच असे नाही. त्यामुळे बऱ्याचदा संशोधकांना त्यावर विश्‍वास ठेऊन आपल्या संशोधनाला गती देता येत नाही.
लिंडहाल यांनी जिवाणू म्हणजे वाईट असा समाजाचा समज आहे. मात्र 99.99 टक्के जिवाणू हे घातक नसतात हे विज्ञान सांगते ते समाजाला पटवून देण्याचे आव्हान संशोधकांसमोर असल्याचे नमूद करून सांगितले, की जिवाणूंमुळे ही सृष्टी आहे. जिवाणू संपले तर सृष्टीचे अस्तित्वही राहणार नाही.या जिवाणूंवरील संशोधनातून अनेक जीवरक्षक औषधे निर्माण झाली आहेत. तरीही आज जग जीवाणूंना मारून टाका याच मोहिमेवर आहे. संशोधनाचे काम हे गुप्तहेरासारखे असते. त्याला सतत हे असे का असे प्रश्‍न पडत असतात. त्यातून जगाला नवे संशोधन मिळते.

ख्रिस्तीन म्हणाल्या, कुतूहलातून संशोधन पुढे सरकते. प्राणी, पक्षी आणि किटकांची वाढ होत जाते. ती कशी होते याचे कुतूहल लहानपणापासून होते. त्यातूनच पुढे जीवाच्या वाढीसाठीच्या गुणसूत्रांचा शोध लावला. आता सजीवांना मिळणाऱ्या रंगासाठी कारण ठरणाऱ्या गुणसूत्रांचा अभ्यास करत आहे.

कला अकादमीतील दीड हजार क्षमतेचे प्रेक्षागार विद्यार्थ्यांनी आज भरून गेले होते. त्यामुले कला अकादमीच्या आवारात डिजीटल पडद्यांवर हा संवाद दाखविण्याची व्यवस्था करावी लागली.

Web Title: goa news nobel prize winners students fake information