ऐन उन्हाळ्यात कोसळतोय गोकाक धबधबा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

सध्या धरणातून २००० क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. किमान आठ दिवस हे पाणी नदी पात्रातून वाहत मुधोळपर्यंत जात राहणार आहे. सध्या धरणात ११.६१ टीएमसी पाणी साठा असून आठ दिवसानंतर १० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. गतवर्षी याच काळात धरणात ११.९७ टीएमसी पाणी साठा होता.

गोकाक - बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ व जमखंडी तालुक्‍यात नदीचे पात्र कोरडे पडून निर्माण झालेली पाणी समस्या दूर करण्यासाठी हिडकल धरणातून दीड टीएमसी पाणी घटप्रभा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोकाकमधील प्रसिद्ध धबधबाही प्रवाहीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत असून हे सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

बागलकोट जिल्ह्यातील पाणी समस्या दूर करण्यासाठी हिडकल धरणातून घटप्रभा नदीत पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार दीड टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश शासनाने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मधल्या टप्प्यातील कुठल्याही बंधाऱ्यात पाणी न अडवता ते थेट मुधोळपर्यंत सोडण्यात येत आहे. सध्या धरणातून २००० क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. किमान आठ दिवस हे पाणी नदी पात्रातून वाहत मुधोळपर्यंत जात राहणार आहे. सध्या धरणात ११.६१ टीएमसी पाणी साठा असून आठ दिवसानंतर १० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. गतवर्षी याच काळात धरणात ११.९७ टीएमसी पाणी साठा होता.

गोकाक धबधब्याचे सौंदर्य पावसाळ्यात खुलते. हिडकल धरण भरल्यानंतर हा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत राहतो. संपूर्ण पावसाळभर त्याचे सौंदर्य लुटता येते. त्यामुळे पावसाळ्यात गोकाकला पर्यटकांची गर्दी असते. पाणी कमी झाल्यानंतर धबधब्याचा आकार कमी होत जातो. पण, यंदा घटप्रभा नदीत उन्हाळ्यात पाणी सोडल्याने धबधबा प्रवाहीत झाला आहे. तो आणखी आठ दिवस प्रवाहीत राहणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धबधबा पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे.

Web Title: Gokaka waterfall tourist spot