सोन्याचा भाव पुन्हा उच्चांकी पातळीवर; नवा दर...

पीटीआय
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

- सोन्याच्या भावाने गाठली पुन्हा ऐतिहासिक उच्चांकी पातळी.

- सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅमला 50 रुपयांनी वधारून 38 हजार 820 रुपयांवर.

नवी दिल्ली : सोन्याच्या भावाने राजधानी दिल्लीत बुधवारी पुन्हा ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅमला 50 रुपयांनी वधारून 38 हजार 820 रुपयांवर गेला. 

देशांतर्गत बाजारात वाढलेली मागणी सोन्याचा भावात आज वाढ होण्यास कारणीभूत ठरली. याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव घसरल्याने स्थानिक पातळीवरील भावातील तेजी काही प्रमाणात रोखली गेली. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याच्या सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅमला 50 रुपयांनी वधारून 38 हजार 820 रुपयांवर गेला. याचवेळी स्टॅंडर्ड सोन्याचा भावही तेवढीच वाढ होऊन 38 हजार 650 रुपयांवर गेला. 

चांदीच्या भावात आज प्रतिकिलो 1 हजार 140 रुपयांची वाढ होऊन 45 हजार 40 रुपयांवर गेला. औद्योगिक आणि नाणी तयार करणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने चांदीचे भाव वधारले. जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात आज घसरण होऊन तो प्रतिऔंस 1 हजार 499 डॉलरवर आला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिऔंस 17.08 डॉलरवर आला. 

मुंबईत भाव घसरले 

मुंबईत आज शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला 133 रुपयांची घसरण होऊन 37 हजार 700 रुपयांवर आला. स्टॅंडर्ड सोन्याचा भावही तेवढीच घसरण होऊन 37 हजार 549 रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोला 120 रुपयांची वाढ होऊन 43 हजार 815 रुपयांवर गेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold rate Higher New Rate is 38 Thousand