आदित्यला गुगलकडून 1.2 कोटींची 'ऑफर' 

पीटीआय
सोमवार, 9 जुलै 2018

2017-18मध्ये झालेल्या एसीएम इंटरनॅशनल कॉलिजीएट प्रोग्रामिंग कॉन्टेस्ट (आयसीपीसी)मध्ये अंतिम फेरीत पोचलेल्यांमध्येही आदित्यचा समावेश आहे. "आयसीपीसी' ही संगणकीय भाषेच्या सांकेतिकीकरणात (कोडिंग) रुची असलेल्यांसाठीची प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा आहे.

बंगळूर : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी-बंगळूर (आयआयआयटी-बी) या संस्थेचा विद्यार्थी असलेल्या आदित्य पालिवाल याला गुगल कंपनीने वार्षिक 1.2 कोटी रुपयांच्या पगाराची नोकरी दिली आहे. मूळचा मुंबईचा असलेला आदित्य (वय 22) हा एमटेक (इंटिग्रेटेड)चा विद्यार्थी असून, तो 16 जुलैपासून गुगलच्या न्यूयॉर्क येथील कार्यालयात रुजू होणार आहे. 

आज झालेल्या "आयआयआयटी-बी'च्या 18व्या दीक्षान्त समारंभात आदित्यला एमटेक (इंटिग्रेटेड) पदवी प्रदान करण्यात आली. आदित्य हा गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विभागात संशोधक म्हणून काम करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी गुगलने चाचणी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत जगभरातून सहभागी झालेल्या सहा हजार उमेदवारांमधून अंतिम 50 जणांची निवड करण्यात आली असून, त्यात आदित्यचा समावेश आहे. वाहन चालविण्याचा आदित्यला छंद असून, तो फुटबॉल आणि क्रिकेटचाही चाहता आहे. 

2017-18मध्ये झालेल्या एसीएम इंटरनॅशनल कॉलिजीएट प्रोग्रामिंग कॉन्टेस्ट (आयसीपीसी)मध्ये अंतिम फेरीत पोचलेल्यांमध्येही आदित्यचा समावेश आहे. "आयसीपीसी' ही संगणकीय भाषेच्या सांकेतिकीकरणात (कोडिंग) रुची असलेल्यांसाठीची प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा आहे. जगभरातील 111 देशांमधील तीन हजार विद्यापीठांतील सुमारे 50 हजार विद्यार्थी चालू वर्षी या स्पर्धेत सहभागी झाले होते. 

Web Title: Google gives Rs 1 crore offer to Aditya