गुगलवरील नकाशांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका : दिल्ली उच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जुलै 2019

किसालया शुक्‍ला या वकिलाने दिल्ली उच्च न्यायलयात गुगल मॅपसंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्याच्या सुनावणीच्या वेळी दिल्ली उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरीशंकर यांच्या खंडपीठाने सरकारला हे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : गुगलच्या माध्यमातून भारताचे नकाशे अपलोड करण्यापासून थांबविता येतील का, याची चाचपणी करण्याची सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी केली. नकाशे अपलोड केल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. 

किसालया शुक्‍ला या वकिलाने दिल्ली उच्च न्यायलयात गुगल मॅपसंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्याच्या सुनावणीच्या वेळी दिल्ली उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरीशंकर यांच्या खंडपीठाने सरकारला हे निर्देश दिले आहेत. अतिसंवेदनशील आस्थापने सामान्यांसाठी प्रतिबंधित असतात. मात्र लोक गुगल मॅप्स, गुगल अर्थ आणि उपग्रह छायाचित्रांद्वारे सहज तेथपर्यंत पोचू शकत असल्याने अशा बंधनांना काहीही अर्थ उरत नाही, असे शुक्‍ला यांनी याचिकेत म्हटले आहे. 

बाहेरील व्यक्ती, संस्था यांना देशाच्या नकाशांची माहिती पुरविण्याचा अधिकार केवळ भारत सरकारला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. खासगी कंपन्यांच्या सेवेवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून 'NavlC' ही नेव्हिगेशन प्रणाली सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारला देण्याची विनंती शुक्‍ला यांनी न्यायालयाला केली आहे. यामुळे गुगलवर भारताचे नकाशे प्रकाशित करण्यावर बंदी घालण्याची आवश्‍यकता आहे का, याची चाचपणी करण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. जर गरज भासली तर भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार कंपनीला आदेश देण्याचा विचार न्यायालयाने केला आहे. 

शुक्‍ला यांच्या याचिकेतील दावे 
- गुगल मॅप्समुळे भारताची एकात्मता धोक्‍यात 
- मुंबई हल्ल्यांची योजना आखताना दहशतवाद्यांनी गुगल इमेजेसच्या साह्याने शहराची रेकी केली 
- इंटरनेटवरील नकाशे आणि गुगल अर्थवरील उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक भागाची माहिती काढता येते 
- भारतातील अतिसंवेदनशील परिसराची माहिती गुगल मॅप्स आणि गुगल अर्थसारख्या माध्यमांवर उपलब्ध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Maps threatens countrys security says Delhi High Court