मोदी हा ब्रॅंड तर गांधी हा विचार!

गोपाळ कुलकर्णी
सोमवार, 16 जानेवारी 2017

कपड्यांचे मार्केटिंग करण्यासाठी मोदी चांगले ब्रॅंड ऍम्बेसिडर ठरू शकतात. पण त्यांनाही त्यामागचा विचार मांडण्यासाठी परत गांधीबाबांच्या कुटीमध्ये जावे लागते. हेच महात्मा गांधी यांचे मोठेपण आहे. भाजपचे हरियानातील मंत्री अनिल विज म्हणतात तसे मोदी खादीचे ब्रॅंड असतीलही कदाचित पण महात्मा गांधी खादीमागचा विचार आहे. हे सर्वांनाच मान्य करावे लागेल.

आजमितीस मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा आला आहे. शहरातील बहुतांशजणांचा वीकेंड मॉल्समध्ये ठरलेला असतो. हा वर्ग जेव्हा कपडे खरेदी करतो तेव्हा प्राधान्याने "खिशातील गांधीजी आणि ब्रॅंड' हेच दोन घटक त्यांच्यासमोर असतात. राष्ट्रीय दिनांच्या दिवशी स्टार्च खादी घालून ब्रॅंडेड गाड्या उडवित फिरणाऱ्या किती बगळ्यांना खादी आणि त्यामागचा विचार माहीत असतो? राळेगणसिद्धीचे "सोकॉल्ड गांधी' अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन ऐन भरात असताना तर खादीच्या धोतराची चर्चा गल्ली ते दिल्ली सगळीकडेच रंगली होती. पण ही सगळी पुण्याई गांधीबाबांचीच. 

सध्याच्या कार्पोरेट आयडेंटिच्या युगामध्ये उत्पादनाच्या "ब्रॅंड व्हॅल्यू'ला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे, ब्रॅंडचा जवळचा संबंध हा ग्राहकांच्या जीवनशैलीशी असतो आणि जीवनशैली ही आर्थिक आणि सामाजिक दर्जावर ठरत असते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या खादी आणि चरखा या दोन गोष्टींचा आपल्याला केवळ वस्तू म्हणून विचार करता येणार नाही.

जेव्हा आपण या दोन्ही घटकांचे केवळ भौतिक वस्तू स्वरूप नाकारू तेव्हा त्याला ब्रॅंडच्या चौकटीमध्येही अडकवता येणेही शक्‍य नसल्याचे आपल्या लक्षात येईल. एकदा वस्तूचे ब्रॅडिंग करायचं ठरलं की त्याचा ब्रॅंड ऍम्बॅसिडर देखील येतो. बाजारपेठेच्या फायद्या तोट्याच्या गणितामध्ये तो कधीही स्थायी असत नाही. सरकारने खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या कॅलेंडर आणि डायऱ्यांवरून यंदा गांधीबाबांना "डिलिट' करत तेथे मोदींना "पेस्ट' केल्याने देशभर वादंग निर्माण झाला. पण चरखा आणि खादी या दोन गोष्टींची महत्ता मुळापासून लक्षात घेतली, तर या देशातील शेंबडं पोर देखील सांगेल की चरख्यासोबत आमचा गांधीबाबाच चांगला दिसतो. 

गांधींचा श्रम आध्यात्म विचार 
श्रीमद भगवदगीतेला शाश्‍वत धर्मग्रंथ मानणाऱ्या महात्मा गांधींनी विशुद्ध धर्मसाधना करतच भारतीय समाजाला श्रमसंस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. हा श्रमसंस्कार त्यांनी आधी स्वत:मध्ये रूजवून घेतला आणि नंतर तो देशासमोर मांडला. त्यामुळेच गुजरातमधील व्यापारी संस्कृतीमध्ये वाढलेल्या महात्मा गांधींनी तो विचार मांडताना "बनायागिरी' केली नाही. गांधी विचारप्रणालीमध्ये सर्व घटकांचा सर्वोदय दिसून येतो. पुढे जेवढे महात्मा गांधींचे अनुयायी निर्माण झाले त्यांच्यामध्ये तो श्रमआध्यात्म विचार प्रकर्षाने आढळून आला. आचार्य विनोबा भावे हे याच परंपरेचे पाईक होते. गांधीजींनी आर्थिक स्वावलंबनाचा विचार करताना मूळ भारतीय कृषक संस्कृतीचा गाभा केंद्रस्थानी ठेवला. म्हणूनच ते 2 मे 1925 रोजी फरिदपूर येथील औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते आवर्जून सांगतात की भारताचा उद्धार हा चरख्याने होईल.

सूतकताईचे काम हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा ठरू शकतो असा दावा करताना गांधीजी आपल्या हिंद भूमीतील शेतकरी आळशी नसल्याचे ठासून सांगतात. "चरखा व खादी हा भारताचा प्राण आहे, मी त्याची तुलना सुदर्शनचक्राशी करतो. कामधेनूची उपमा मी त्याला देतो. चरख्याचा विध्वंस म्हणजे हिंदी दारिद्रयाचा प्रारंभ होय. ते दारिद्रय दूर करण्यासाठी आपण चरख्याला पुन्हा प्रतिष्ठित केले पाहिजे. हिंदी घरात चरख्याला अग्रस्थान असले पाहिजे. आपल्या उपाशी बांधवांच्या उद्धारासाठी देवाचे नाव घेऊन आपण दररोज अर्धातास प्रत्येक घरात चरखा चालवू या.'' हा विचार जेव्हा गांधीजी मांडतात तेव्हा चरखा आणि खादी केवळ भौतिक वस्तू राहत नाहीत. जे हिंद स्वराज गांधीजींना अपेक्षित होतं त्यामागेही एक वेगळा अर्थविचार होता. तो पुढे भारतीयांनी कितपत स्विकारला हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. स्वराज्याचे प्रमुख साधन म्हणजे सूत काता, ते विणा आणि खादी वापरा असं जेव्हा गांधीजी सांगतात तेव्हा त्यामागे जसा स्वदेशीचा आग्रह आहे तसाच येथे आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचा देखील विचार दिसून येतो. 

राजकारणाची खादी 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजवादी, डाव्या चळवळींनी काही काळ स्वदेशी उत्पादनांचा आग्रह धरत नव्या तंत्रज्ञानाला विरोध केला. नवी यंत्रे आल्याने रोजगारावर गदा येईल असा दावा ही मंडळी करत होती. संघ परिवाराचाच भाग असणाऱ्या "स्वदेशी जागरण मंच'सारख्या संघटनांनी पुढे आपल्या सोयीने स्वदेशीचा नारा दिला. यामागे बहुराष्ट्रीय कंपन्यांना विरोध आणि स्वदेशी मालाचा स्विकार हे सूत्र होतं. यातील दैवदुर्विलास असा की गुजरातमध्ये जेव्हा "स्वदेशी जागरण मंच'ने बी.टी बियाणांना विरोध केला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीच त्यांना भाजप कार्यालयातून बोरी बिस्तर गुंडाळायला भाग पाडले होते. त्यामुळे संघ परिवाराचा स्वदेशी आग्रह "पतंजली छाप' ठरतो.

आजमितीस मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा आला आहे. शहरातील बहुतांशजणांचा वीकेंड मॉल्समध्ये ठरलेला असतो. हा वर्ग जेव्हा कपडे खरेदी करतो तेव्हा प्राधान्याने "खिशातील गांधीजी आणि ब्रॅंड' हेच दोन घटक त्यांच्यासमोर असतात. राष्ट्रीय दिनांच्या दिवशी स्टार्च खादी घालून ब्रॅंडेड गाड्या उडवित फिरणाऱ्या किती बगळ्यांना खादी आणि त्यामागचा विचार माहीत असतो? राळेगणसिद्धीचे "सोकॉल्ड गांधी' अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन ऐन भरात असताना तर खादीच्या धोतराची चर्चा गल्ली ते दिल्ली सगळीकडेच रंगली होती. पण ही सगळी पुण्याई गांधीबाबांचीच. अण्णा फक्त एक चेहरा होते (नंतर ते किरण बेदी आणि केजरीवाल यांच्या हातातील बाहुले असल्याचेही उघड झाले.. हा भाग अलाहिदा!) आज जे काही वलय आणि नैतिक धागे खादीच्या कपड्यात सापडतात ते फक्त महात्मा गांधी यांच्यामुळेच. हल्लीच्या इव्हेंटबाज जनरेशनला त्यातील विचार कितपत समजेल याबाबत साशंकताच आहे. खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिकेवरून गांधीचा फोटो काढल्याने गांधी विचार संपेल असे समजणेही चुकीचे आहे. संगणकीय "कटपेस्टिंग'मुळे संपण्याएवढा गांधी विचार नक्कीच तकलादू नाही. सगळ्याच गोष्टींचा आपल्या सोयीने अर्थ लावणाऱ्या आपल्या बनचुक्‍या व्यवस्थेला गांधी इतक्‍या लवकर संपणे परवडणारे नाही. कारण आजही अनेकांच्या पोटापाण्याचे उद्योग केवळ गांधी या नावावरच चालतात.

एकीकडे देशामध्ये गांधी डिलिटींगची प्रक्रिया सुरू असताना ऍमेझॉन या बहुराष्ट्रीय कंपनीने डोअरमॅटवर भारताचा राष्ट्रध्वज छापला. देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दम भरल्यानंतर कंपनीने माफी मागत ती वादग्रस्त डोअरमॅट संकेतस्थळावरून काढून टाकली. आता चपलांवर महात्मा गांधींचे छायाचित्र छापून कंपनीने आपली बौद्धिक लायकी दाखवून दिली आहे. बाजारात एकदा धंद्यासाठी उभे राहिलं की कंबरेचेही कसं काढून ठेवायचं हे मात्र या कार्पोरेट कंपन्यांकडूनच शिकावे लागले. येथेही तत्त्व मुल्यांपेक्षा बाजारपेठेचा सिद्धांत प्रबळ ठरतो. बाजारात कुणी तरी घेणारं आहे म्हणूनच या वस्तू तयार केल्या जातात. हल्लीच्या मार्केटमधील ग्राहकांना काय खरेदी करावं आणि काय करू नये? हे सांगण्यासाठीही बहुधा गांधीजींची माकडंच आणावी लागतील. परराष्ट्रमंत्री कम पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांची नेहमीच चर्चा होत असते. मध्यंतरी त्यांनी घातलेला दहा लाखांचा सूट देखील असाच चर्चेचा विषय ठरला होता. मोदी कुर्ता असाही एक नवा ब्रॅंड बाजारात आला आहे. कपड्यांचे मार्केटिंग करण्यासाठी मोदी चांगले ब्रॅंड ऍम्बेसिडर ठरू शकतात. पण त्यांनाही त्यामागचा विचार मांडण्यासाठी परत गांधीबाबांच्या कुटीमध्ये जावे लागते. हेच महात्मा गांधी यांचे मोठेपण आहे. भाजपचे हरियानातील मंत्री अनिल विज म्हणतात तसे मोदी खादीचे ब्रॅंड असतीलही कदाचित पण महात्मा गांधी खादीमागचा विचार आहे. हे सर्वांनाच मान्य करावे लागेल.

Web Title: Gopal Kulkarni write about Narendra Modi khadi row