गोरखपूर: ही पहिली वेळ नव्हे - अमित शहा

पीटीआय
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, ही कॉंग्रेसने केलेली मागणी शहा यांनी फेटाळून लावली. यूपीए सरकारच्या काळातही अशा घटना घडल्या आहेत. विरोधी पक्षाकडून या घटनेचे भांडवल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही शहा यांनी केला

बंगळूर - गोरखपूरमधील बीआरडी रुग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्यूसारखी घटना भारतासारख्या मोठ्या देशात घडत असतात. अशी घटना घडण्याची ही काही पहिली वेळ नाही, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केले. काही झाले की, राजीनामा मागणे हे कॉंग्रेस नेत्यांचे कामच आहे, अशी पुस्तीही शहा यांनी जोडली आहे.

बंगळूर दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. गोरखपूरमधील घटनेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना शहा म्हणाले, ""भारतासारख्या मोठ्या देशात अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे ही काही पहिली वेळ नव्हे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, यात दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही.''

याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, ही कॉंग्रेसने केलेली मागणी शहा यांनी फेटाळून लावली. यूपीए सरकारच्या काळातही अशा घटना घडल्या आहेत. विरोधी पक्षाकडून या घटनेचे भांडवल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही शहा यांनी केला.

गोकुळाष्टमी साजरी होणार
गोकुळाष्टमी हा महत्त्वाचा उत्सव असून, राज्यात तो साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत. याविषयी बोलताना अमित शहा म्हणाले, ''गोकुळाष्टमी हा काही सरकारी उत्सव नाही. तो लोकांच्या श्रद्धेचा व इच्छेचा भाग असून, ज्याप्रमाणे देशात इतर ठिकाणी हा उत्सव साजरा होईल. त्याचप्रमाणे इथेही तो साजरा केला जाईल.''

Web Title: gorakhapur tragedy amit shah uttar pradesh