डॉक्‍टरला बळीचा बकरा बनविले: एम्स डॉक्‍टरांचा आरोप

पीटीआय
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जर रुग्णालयात ऑक्‍सिजन, सर्जिकल उपकरणे, पायाभूत सुविधा आणि औषधी उपलब्ध नसतील तर जबाबदार कोण? सरकारला वाटते की, या प्रकाराला डॉक्‍टरच जबाबदार आहेत. अकार्यक्षमता लपवण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातील संबंध खराब करू नयेत

नवी दिल्ली/गोरखपूर - गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील बालकांच्या मृत्युप्रकरणी डॉ. कफील खान यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर एम्सच्या डॉक्‍टरांनी टीका केली आहे. 48 तासांत रुग्णालयात 30 बालकांच्या मृत्यूप्रकरणी खान यांना बळीचा बकरा बनवल्याचे एम्सच्या डॉक्‍टरांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे रुग्णालयाच्या संकटकाळात खिशातून पैसे खर्च करून डॉ. खान यांनी ऑक्‍सिजनचे सिलिंडर आणले होते तेव्हा त्यांचे कौतुक झाले होते. यासंदर्भात एम्सच्या निवासी डॉक्‍टर संघाचे अध्यक्ष डॉ. हरजितसिंह भट्टी म्हणाले की, सरकारी यंत्रणातील उणिवा आणि दोष झाकण्यासाठी पुन्हा एकदा डॉक्‍टरला बळीचा बकरा बनविले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे उत्तर प्रदेश सरकारचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचाही आरोप डॉ.भट्टी यांनी केला आहे. जर रुग्णालयात ऑक्‍सिजन, सर्जिकल उपकरणे, पायाभूत सुविधा आणि औषधी उपलब्ध नसतील तर जबाबदार कोण? सरकारला वाटते की, या प्रकाराला डॉक्‍टरच जबाबदार आहेत. अकार्यक्षमता लपवण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातील संबंध खराब करू नयेत, असे आवाहन त्यांनी राजकीय नेत्यांना केले आहे.

Web Title: gorakhpur tragedy uttar pradesh