गाैरी लंकेश हत्या प्रकरणः कुरणेच्या शेतात बंदूक प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या बेळगावातील भरत कुरणे याच्या शेतात केवळ एअर गनचेच नाही, तर खऱ्या बंदूक व काडतुसांचा वापर करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय तपास पथकाने मोस्ट वांटेड म्हणून जाहीर केलेला कोल्हापूरचा प्रवीण लिमकरसुद्धा त्याच्या शेतात येऊन गेल्याची माहिती विशेष तपास पथकाला (एसआयटी) मिळाली आहे.

महाराष्ट्र व गोव्यातील काही संशयितांनी कर्नाटकातील युवकांचा वापर करून संशोधक एम. एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची निश्‍चित स्वरुपाची माहिती एसआयटी अधिकाऱ्यांना मिळाली असल्याचे समजते. आतापर्यंत महाराष्ट्रातील अमोल काळे व अमित डिगवेकर यांना एसआयटीने अटक केली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेले काही संशयित गोवा स्फोट प्रकरणासह विविध प्रकरणात राष्ट्रीय तपास पथकाला हवे होते.

भरत कुरणेच्या अटकेनंतर ही माहिती उघड झाली आहे.
राष्ट्रीय तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रवीण लिमकर यांच्यासह रुद्र पाटील, सारंग अकोलकर, जयप्रकाश ऊर्फ अण्णा यांच्या अटकेसाठी लुकआऊट नोटीस जारी केली होती.

एनआयए, महाराष्ट्र एसआयटी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. बेळगाव, गोवा व महाराष्ट्राच्या सीमाभागातील जंगलात युवकांना ते बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देत होते, अशी माहिती भरत कुरणे याच्या चौकशीतून पुढे आली आहे. 

ताब्यात घेण्याबद्दल उद्या निकाल
भरत कुरणे यास एसआयटीच्या ताब्यात द्यायचे किंवा नाही याची तृतीय एसीएमएम न्यायालयाने सुनावणी करून निकाल सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे. एसआयटीची न्यायालयात बाजू मांडणारे विशेष सरकारी अभियोजक श्रीशैल वडवडगी यांनी, संशयिताला गोवा, पुणे व महाराष्ट्रात चौकशीसाठी घेऊन जावयाचे आहे. त्याच्या शेतात बंदुकीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असा दावा केला. 

Web Title: Gouri Lankesh Murder case followup