गौरी लंकेश हत्या प्रकरणः मास्टर माईंड निहालचा महाराष्ट्रात शोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार निहाल ऊर्फ दादा अद्याप भूमिगत असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी एसआयटी अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्रात गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार निहाल ऊर्फ दादा अद्याप भूमिगत असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी एसआयटी अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्रात गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित अमोल काळे याचा गुरू म्हणून ओळखण्यात येणारा निहाल ऊर्फ दादा हाच गौरी लंकेश प्रकरणातील मास्टर माईंड असल्याची खात्री एसआयटी अधिकाऱ्यांना झाली आहे. यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी एसआयटीने विशेष कृती आराखडा आखला आहे.

मूळ महाराष्ट्रातील असलेला निहाल हा सरकारी नोकर आहे. 
त्याचे खरे नाव निहाल नाही. प्रत्येक वेळी तो आपले नाव बदलून सांगत असल्याची पोलिसांना शंका आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले परशुराम वाघमारे व अमोल काळे यांनी त्यांच्या चौकशीत निहालचेच नाव घेतले आहे. निहालच्या मार्गदर्शनानुसारच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे त्यांनी कबूल केले असल्याचे समजते.

गौरीच्या हत्येनंतर आपल्याला दोघेजण भेटण्यासाठी गावात आले व त्यांनी आपल्याला १० हजार रुपये दिले. कुणाला सापडू नकोस, कोणी विचारलेच तर मला माहीत नाही म्हणून सांग. तुझी व तुझ्या कुटूंबाची आम्ही काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले. पैसे दिलेली व्यक्ती उंच वकीलासारखी दिसत होती. पैसे दिलेली व्यक्‍ती त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तीला दादा म्हणून बोलवित होती, अशी माहिती परशुराम वाघमारे यांने त्याच्या चौकशीत सांगितल्याचे समजते.

दादा म्हणजेच निहाल?
वाघमारेचा जबाब नोंदवून घेतलेल्या तपास अधिकाऱ्यांना दादा म्हणजेच निहाल असल्याची खात्री पटली आहे. निहालच्या शोधासाठी तपास अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्रात गेले आहे. त्‍याचा शोध लागल्यास गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा शेवट होण्यास मदत होईल, असा अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो.

मंडोळी रोडवर एका संशयिताची चौकशी?

बेळगाव - गौरी लंकेश हत्या प्रकरणी भरत कुरणे याला अटक झाल्यानंतर एसआयटी पथकाने बेळगाववरही लक्ष केंद्रित केले आहे. कुरणेकडून या प्रकरणाशी संबंधित आणखी काही नावे पुढे आली असून एसआयटीने मंडोळी रोडवर एका संशयिताला ताब्यात घेण्याचे प्रयत्न केल्याचे सूत्रांकडून समजते.

लंकेश हत्या प्रकरणी भरत कुरणे याने संशयितांना आश्रय दिल्याचा आरोप असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आता पुन्हा नवीन नावे पुढे येत असल्याचे समजते. एसआयटीचे एक पथक संशयितांच्या शोधार्थ बेळगाववर लक्ष 
ठेऊन आहे. 

शनिवारी (ता. ११) रात्री मंडोळी रोडवरील एकाला ताब्यात घेण्यासाठी एसआयटी पथक गेले होते. पण, तो संशयीत त्यांच्या हाती लागू शकला नाही. त्यामुळे रविवारी दिवसभर पथक बेळगाव होते, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. बेळगावातील सर्व संशयितांची छायाचित्रे देखील त्यांच्याकडे असून त्यामुळे तपासाला जोर आला आहे.

Web Title: Gouri Lankesh Murder followup