बिहार ‘आघाडी’वर तीस हजार जवान

बिहार ‘आघाडी’वर तीस हजार जवान

नवी दिल्ली - बिहारमध्ये तीन टप्प्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र दलाचे ३० हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये शांततेच्या वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्स (सीएपीएफएस) च्या ३०० तुकड्या आणि रेल्वे संरक्षण दलाच्या तुकड्या मागवण्यात येणार आहेत. 

बिहारमध्ये पुढील महिन्यात निवडणुका होत असून त्यादृष्टीने निवडणूक आयोग आणि सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. बिहारमध्ये २४३ जागांसाठी तीन टप्प्यात म्हणजेच २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर असे मतदान होत असून १० नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत. सध्या कोरोनाचा काळ असून अशा स्थितीत विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडणे जिकरीचे काम असून ते सुरळीत पार पाडण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी केंद्राकडून मोठ्याप्रमाणात फौजफाटा पाठवण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव दलाच्या ८० तुकड्या, सशस्त्र सीमा बल (एसएसबी)च्या ७० तुकड्‌या, सीमा सुरक्षा दलाच्या ५५आणि सीआयएसएफच्या ५० तुकड्या, आयटीबीपीच्या ३० आणि शीघ्र कृती दल (आरपीएफ)च्या १५ तुकड्‌यांना पाचारण करण्यात येणार आहे. एका तुकडीत साधारणत: १०० जवान असतात. एकूण ३०० कंपन्यांना किंवा ३० हजार जवानांना तातडीने हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या हे जवान विविध ठिकाणी बंदोबस्तावर किंवा प्रशिक्षणात असले तरी त्यांना तातडीने ती जागा सोडून बिहारमध्ये येण्यास सांगितल्याचे सूत्राने म्हटले आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागदर्शक सूचनांच्या उल्लंघनाबद्धल गुन्हा
पाटणा विमानतळावर शनिवारी कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिहार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी करत कोविडच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी मोहंमद सैफुल्लाह खान यांनी विमानतळ पोलिस ठाण्याकडे १८८ नुसार तक्रार दाखल केली. या तक्रारीत कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि प्रचारप्रमुख अखिलेश प्रसाद सिंह, कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रभारी अजय कपूर यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com