मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी होईल नेताजींची जयंती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

या वर्षी येत्या 23 जानेवारीला नेताजींची 125 वी जयंती साजरी केली जाणार आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी महान स्वातंत्र्य सेनानी आणि आझाद हिंद फौजचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आता दरवर्षी 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने दिली आहे. या वर्षी येत्या 23 जानेवारीला नेताजींची 125 वी जयंती साजरी केली जाणार आहे. 

संस्कृती मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अधिसुचनेत म्हटलं गेलंय की, नेताजींच्या निस्वार्थ सेवेला आणि त्यांच्या योगदानाला सदैव स्मरणात ठेवण्यासाठी भारत सरकारने देशवासीयांसाठी तसेच युवकांना प्रेरणा देण्यासाठी येत्या 23 जानेवारी रोजी पराक्रम दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजींनी आपल्या खडतर संघर्षाद्वारे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं.

यावर्षीच येत्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भाजप हरतर्हेने प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे आपली सत्ता वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी 23 जानेवारी रोजी प. बंगालच्या दौऱ्यावर जाऊ शकतात. तिथे ते कोलकातामधील विक्टोरियल मेमोरियलमध्ये होणाऱ्या नेताजी बोस यांच्या जयंती समारंभात सहभाग नोंदवू शकतात.

हेही वाचा - Farmers Protest : 'आम्ही कोर्टाकडे गेलो नव्हतो, संसदमार्गे आलेले कायदे त्याच मार्गाने जातील'

दरम्यान बंगालचे भाजपाचे प्रभारी आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, स्वागतार्ह निर्णय आहे. केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन नेताजींच्या विचारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांपर्यंत पोहचवता येईल आणि युवकांना त्यापासून प्रेरणा मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government of India birthday of Netaji Subhash Chandra Bose Parakram Diwas Ministry of Culture