दाऊद इब्राहिमबाबत सरकारचे मौन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 जानेवारी 2017

दहशतवादाच्या मुकाबल्यासंबंधी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सुरक्षा यंत्रणा या संयुक्त अरब अमिरातीमधील सुरक्षा यंत्रणांच्या सतत संपर्कात असतात. त्यामध्ये विविध मुद्दे सातत्याने येत असतात. परंतु दाऊदशी संबंधित विशिष्ट व नेमक्‍या मुद्द्याबाबत काही सांगता येणार नाही. कारण अशा संबंधांमध्ये विशिष्ट अशा मुद्द्यांना जागा नसते, अशी सारवासारव अकबर यांनी केली

नवी दिल्ली - मुंबई स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने जप्त केल्याच्या काही तथाकथित बातम्यांना दुजोरा देण्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज नाकारले. भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, भारतीय सुरक्षा यंत्रणा या संयुक्त अरब अमिरातीच्या सुरक्षा यंत्रणाशी सतत संपर्कात असतात आणि त्यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश असतो. परंतु दाऊदविषयक या विशिष्ट प्रकरणाबाबत स्वतंत्रपणे काही सांगता येणार नाही, असे उत्तर परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी दिले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या कामगिरीचा मध्यावधी आढावा सादर करण्यासाठी खात्याचे दोन राज्यमंत्री एम. जे. अकबर आणि व्ही. के. सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती अद्याप पूर्ववत नसल्याने त्या अनुपस्थित होत्या. मध्यावधी आढाव्याच्या सादरीकरणानंतर झालेल्या प्रश्‍नोत्तरात दाऊद इब्राहिमबाबत काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. तसेच भारत व पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध, चीनतर्फे मसूद अजहर, "एनएसजी'मधील भारताचा प्रवेश याबाबत घेतली जाणारी अडथळ्याची भूमिका, रशियाबरोबरच्या संबंधांत निर्माण होत असलेला वाढता दुरावा, नेपाळबरोबरच्या संबंधांतही आलेले अडथळे याबाबत प्रश्‍न विचारण्यात आले.

दाऊदबाबतच्या प्रश्‍नावर बोलताना अकबर यांनी संयुक्त अरब अमिरातीबरोबर मोदी राजवटीच्या काळात अत्यंत निकटचे, सखोल आणि व्यापक संबंध प्रस्थापित झाल्याचा दावा केला. तसेच सामरिक स्वरूपाचे द्विपक्षीय संबंध आणखी व्यापक होत असल्याचे सांगून सामरिक संबंध आणि दहशतवादाचा मुकाबला हे त्याचे प्रमुख पैलू असल्याचे सांगितले. दहशतवादाच्या मुकाबल्यासंबंधी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सुरक्षा यंत्रणा या संयुक्त अरब अमिरातीमधील सुरक्षा यंत्रणांच्या सतत संपर्कात असतात. त्यामध्ये विविध मुद्दे सातत्याने येत असतात. परंतु दाऊदशी संबंधित विशिष्ट व नेमक्‍या मुद्द्याबाबत काही सांगता येणार नाही. कारण अशा संबंधांमध्ये विशिष्ट अशा मुद्द्यांना जागा नसते, अशी सारवासारव अकबर यांनी केली. त्यावर पत्रकारांनी त्यांना "होय' किंवा "नाही' अशा स्वरूपात उत्तर देता येईल काय, अशी विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत असमर्थता व्यक्त केली.

भारताची भूमिका कायम
पाकिस्तानबरोबरच्या संबंधांबाबत बोलताना अकबर यांनी पाकिस्तान हा शेजारी देश आहे आणि त्याचे स्थान बदलता येणार नाही हे वास्तव आहे. पाकिस्तानबरोबर चांगले संबंध प्रस्थापित असावेत या भारताच्या मूलभूत भूमिकेतही फरक पडलेला नाही. परंतु यासाठी जे अनुकूल वातावरण व परिस्थिती लागते ती नसल्याने आणि त्यास पाकिस्तान कारणीभूत असल्याने उभय देशांत सुसंवाद होऊ शकत नाही. त्यामुळेच दहशतवादी कारवाया आणि संवाद हे एकाचवेळी घडू शकत नसल्याची भारताची भूमिका आहे व ती कायम आहे, असे स्पष्ट केले.

Web Title: Government keeps mum on dawood ibrahim