दहशतवाद्यांविरोधात पुन्हा ऑपरेशन 'ऑलआऊट' : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

राजनाथसिंह यांनी रमजान महिन्यात भारतीय लष्कराकडून कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे 16 मेला जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही दहशतवाद्यांकडून दहशतवादी कारवाई करण्यात येत होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी वाढविण्याबाबत नकार देण्यात आला आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. मात्र, आता ही शस्त्रसंधी वाढविली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज (रविवार) स्पष्ट केले.

भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराकडून मोहीम राबविण्यात येत होती. मात्र, ही कारवाई रमजान महिन्यात थांबविण्याची मागणी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली होती. त्यानंतर राजनाथसिंह यांनी रमजान महिन्यात भारतीय लष्कराकडून कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे 16 मेला जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही दहशतवाद्यांकडून दहशतवादी कारवाई करण्यात येत होती. त्यानंतर गुरुवारी दहशतवाद्यांनी ईदच्या सुट्टीसाठी घरी परतणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या जवानाचे अपहरण करून त्याची हत्या केली होती. याशिवाय जम्मू-काश्मीरचे पत्रकार आणि 'रायजिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारी यांची गोळी मारून हत्या केली.

त्यानंतर राजनाथसिंह यांनी शस्त्रसंधी थांबविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांविरूद्ध पुन्हा एकदा कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Government not to extend cease ops in Kashmir