अधिकाऱ्यांना आता भाजलेले चने, बदाम अन्‌ अक्रोड!

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

मंत्रालयाच्या कॅंटीनमधूनही आता बिस्किटे हद्दपार केली जाणार असून, अधिकाऱ्यांच्या टेबलावर केवळ पौष्टिक सुकामेवाच ठेवण्यात येईल.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्यांच्या मंत्रालयामध्ये पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील बिस्किटच्या विक्रीबरोबरच विविध विभागांच्या बैठकांमध्येही त्यांनी बिस्किटे खाण्यावर बंदी घातली आहे. सर्वच बैठकांमध्ये बिस्किटांऐवजी भाजलेले चने, बदाम, खजूर आणि अक्रोड दिले जावेत, असा फतवाच त्यांनी काढला आहे. 

यासंदर्भातील आदेश शुक्रवारीच जारी करण्यात आला. बड्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केवळ आरोग्यदायी स्नॅक्‍सच दिले जावेत, असा आग्रह आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने धरला आहे. मंत्रालयाच्या कॅंटीनमधूनही आता बिस्किटे हद्दपार केली जाणार असून, अधिकाऱ्यांच्या टेबलावर केवळ पौष्टिक सुकामेवाच ठेवण्यात येईल. तत्पूर्वी, याआधी आरोग्य मंत्रालयाने प्लॅस्टिकच्या बाटल्याही कॅंटीनमधून हद्दपार केल्या होत्या. 

अधिकाऱ्यांकडून स्वागत 
या ताज्या आदेशासंदर्भात बोलताना मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "आमच्या खात्याचे मंत्रिमहोदय हे स्वत: डॉक्‍टर असल्याने त्यांना फास्ट फूडमुळे शरीराचे नेमके काय नुकसान होते, हे माहीत आहे. यामुळेच त्यांनी फास्ट फूड कायमचे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला या ताज्या निर्णयामुळे आनंदच झाला आहे.'' 

प्लॅस्टिकच्या बाटल्या हद्दपार 
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या बाटल्या हद्दपार केल्यानंतर अन्य मंत्रालयांनी त्याचे अनुकरण केले होते. आता सर्वच विभागांमध्ये काचेच्या बाटल्या आणि रिसायकल होऊ शकणाऱ्या पेपर ग्लासचा वापर केला जात आहे. आताही खाद्यपदार्थांच्या बाबतीत अन्य मंत्रालयेदेखील तोच कित्ता गिरविण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For government officers the grilled gram almonds and walnuts