राखीव साठ्याचा आधार; पन्नास लाख पिंपे कच्चे तेल बाजारात आणणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राखीव साठ्याचा आधार; पन्नास लाख पिंपे कच्चे तेल बाजारात आणणार
राखीव साठ्याचा आधार; पन्नास लाख पिंपे कच्चे तेल बाजारात आणणार

राखीव साठ्याचा आधार; पन्नास लाख पिंपे कच्चे तेल बाजारात आणणार

नवी दिल्ली/मुंबई : आणिबाणीच्या वापरासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यातून (स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह) पन्नास लाख पिंपे कच्चे तेल देशांतर्गत वापरासाठी खुले करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर कमी करण्यासाठी अमेरिका, चीन, जपान आणि इतर मोठ्या अर्थव्यवस्थांशी समन्वय ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकाही त्यांच्या राखीव साठ्यातून पाच कोटी पिंपे वापरासाठी खुली करणार आहे.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

युद्धकाळासाठी किंवा देशातील तेलाचा साठा संपला तर वापरण्यासाठी, किंवा परदेशातील पेचप्रसंगामुळे तेलाची आयात थांबली तर वापरण्यासाठी कच्च्या तेलाचे असे साठे करून ठेवलेले असतात. ते सामान्यतः नेहमीसाठी वापरले जात नाहीत, ते फक्त आपातकालीन स्थितीतच वापरले जातात. या साठ्यापैकी काही कच्चे तेल आता देशात वापरासाठी खुले करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. सध्या देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या इंधनावरील कर केंद्र सरकारने कमी करून इंधनाचे दरही कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचेही दाखवून दिले जात आहे.

कच्च्या तेलाचा हा साठा खुला केल्यावर तो मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. आणि एचपीसीएल यांना विकला जाईल. आपत्कालीन वापराच्या तेलसाठ्याशी या दोन कंपन्या इंधनवाहिन्यांमार्फत जोडल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी या कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यावर त्यातून उत्पादित झालेले पेट्रोल, डिझेल आदी इंधन बाजारात विक्रीसाठी आणले जाईल. त्यामुळे इंधनाचे वाढलेले दर काही अंशी कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती काही संबंधित अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

आठवडाभरात अंमलबजावणी शक्य

भारत प्रथमच राखीव साठ्यातील कच्चे तेल खुल्या बाजारात आणणार आहे. हे तेल कधी खुले केले जाईल, हे निश्‍चितपणे जाहीर करण्यात आले नसले तरी, सात ते आठ दिवसांत ते खुले होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा तेल आयातदार देश असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा मोठा फटका भारताला बसला आहे. ‘ओपेक’ आणि इतर तेल उत्पादक देश दररोज चार लाख पिंपे कच्चे तेल बाजारात आणत असतानाही वाढलेले दर कमी करण्यासाठी ते पुरेसे ठरत नसल्याने भारत आणि इतर देशांनी हा निर्णय घेतला आहे.

भारतातील राखीव साठा

भारतात तीन कोटी ८० लाख पिंपे कच्चे तेल भूमिगत टाक्यांमध्ये स्ट्रॅटॅजिक रिझर्व्ह म्हणून साठवलेले आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर तीन ठिकाणी हे साठे आहेत. यापैकी पन्नास लाख पिंपे येत्या आठवड्याभरात खुली केली जातील. भारताचा कच्च्या तेलाचा दैनंदिन वापर ४८ लाख पिंपे इतका आहे. आणखी काही साठा खुला केला जाऊ शकतो, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

"इंधनाचे दर योग्य आणि बाजारावर आधारित असावेत, अशी भारताची भूमिका आहे. तेल उत्पादक देश कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर स्वत:च्या फायद्यासाठी नियंत्रण ठेवतात, याला भारताचा विरोध आहे."

- भारत सरकार

भारताकडील तेलसाठा

राखीव साठा : ३.८० कोटी पिंपे

दैनंदिन वापर : ४८ लाख पिंपे

साठा खुला करणार : ५० लाख पिंपे

loading image
go to top