सरकार आयात करणार सव्वा लाख टन कांदा

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता वाढावी यासाठी १.२ लाख टन कांद्याची आयात करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. अन्न मंत्रालयाने पूर्वीच केलेल्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.

नवी दिल्ली - देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता वाढावी यासाठी १.२ लाख टन कांद्याची आयात करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. अन्न मंत्रालयाने पूर्वीच केलेल्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की अन्न व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी ‘एमएमटीसी’ या सरकारी संस्थेमार्फत एक लाख टन कांद्याच्या आयातीचा निर्णय १६ नोव्हेंबरला जाहीर केला होता. जागतिक बाजारपेठेतून सुमारे ४० हजार टन कांद्याच्या खरेदीसाठी ‘एमएमटीसी’ने निविदाही प्रसिद्ध केली होती. सरकार खासगी आयातदारांनाही उत्तेजन देणार असून, कांद्याच्या धुरीकरणाबाबतचे निकष डिसेंबरपर्यंत शिथिल करण्यात आले आहेत.

कांद्याच्या दरवाढीमुळे नागरिक वैतागले असून, कांदा पुरेसा उपलब्ध व्हावा यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे कांद्याच्या आयातीचा निर्णय झाला आहे. राजधानी नवी दिल्लीत कांद्याचा दर सध्या प्रति किलो ६० रुपयांवर गेला आहे. १५ नोव्हेंबर रोजी देशात कांद्याचा दर सर्वसाधारणतः प्रति किलो ६०.३८ रुपये होता. 

गेल्यावर्षी याच काळात हा दर २२.८४ रुपये होता. २०१९-२० च्या खरीप हंगामात ५२.०६ लाख टन कांद्याच्या उत्पादनाची अपेक्षा होती; पण त्यात २६ टक्के घट झाल्यामुळे कांद्याची दरवाढ होत आहे. दरवाढ रोखण्यासाठी निर्यातबंदी, साठवणुकीवर मर्यादा आदी उपाय सरकारने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government will import all one million tonnes of onion