पेट्रोल लिटरमागे 25 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते: चिदंबरम

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

''सध्या शक्य आहे, की पेट्रोलचे दर लिटरमागे 25 रुपयांपर्यंत कमी केले जाऊ शकते. मात्र, सरकार तसे करत नाही. पेट्रोलच्या दरात एक किंवा दोन रूपयांची कपात करून सरकारकडून लोकांना धोका दिला जात आहे''.

- काँग्रेस नेते पी. चिदंबरम

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. या दरवाढीमुळे विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आज (बुधवार) सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''सरकार पेट्रोलचे दर लिटरमागे 25 रुपयांपर्यंत कमी करू शकते. मात्र, सरकार तसे करत नाही''.

चिदंबरम यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''सध्या शक्य आहे, की पेट्रोलचे दर लिटरमागे 25 रुपयांपर्यंत कमी केले जाऊ शकते. मात्र, सरकार तसे करत नाही. पेट्रोलच्या दरात एक किंवा दोन रूपयांची कपात करून सरकारकडून लोकांना धोका दिला जात आहे''. तसेच चार मेट्रो सिटींतर्गत मंगळवारी पेट्रोलचे दर 30 पैशांनी वाढविण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल 76.87 रूपये तर मुंबईमध्ये 84.70 रुपये प्रतिलिटर विक्री केली जात आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

याबाबत चिदंबरम म्हणाले, ''केंद्र सरकार पेट्रोलच्या प्रतिलिटरच्या दरात 25 रुपयांपर्यंत सूट देऊ शकते. कच्चा तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने पेट्रोलच्या किमतीत कपात होणे गरजेचे आहे. तसेच केंद्र सरकारकडून प्रतिलिटरमागे लावण्यात येणारा 10 रुपयांचा अतिरिक्त कर रद्द केल्यास 25 प्रतिलिटरमागे 25 रुपयांची कपात होऊ शकते''. 

Web Title: Govt can cut petrol prices by up to Rs 25 says Chidambaram