शाई लावणे हा सामान्यांवर अविश्‍वास: ममता

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यास आलेल्या सामान्य नागरिकांना शाई लावण्याच्या निर्णयावर टीका करत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शाई लावणे म्हणजे सामान्यांवर अविश्‍वास असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यास आलेल्या सामान्य नागरिकांना शाई लावण्याच्या निर्णयावर टीका करत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शाई लावणे म्हणजे सामान्यांवर अविश्‍वास असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी आज (मंगळवार) नोटा बदलून घेण्यासाठी तेच तेच नागरिक पुन्हा पुन्हा येऊन गर्दी करत असल्याचे सांगत नोटा बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या बोटांना निवडणुकीप्रमाणे न पुसणारी शाई लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर ट्विटरद्वारे बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "काळी शाई लावण्याचा निर्णय म्हणजे "काळी यंत्रणा' सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न असून सरकार सामान्य नागरिकांवर अविश्‍वास दाखवित आहे. पाचशे आणि एक हजारच्या नोटा रेल्वे स्थानके, पेट्रोल पंपावर चालतात. राष्ट्रीय महामार्गांवरही सूट देण्यात आली आहे. मात्र कृषी, सहकार क्षेत्र, खाजगी रुग्णालयातील रुग्ण, नर्सिंग होम्स, औषधांना अपवाद करण्यात आलेले नाही. हा भेदभाव का?' असा प्रश्‍न बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. तसेच "ही गंभीर परिस्थिती असून कठोर परिस्थिती आहे. लोक त्रस्त आहे. आम्ही या संदर्भात बुधवारी मा. राष्ट्रपतींना भेटणार आहोत' असेही त्यांनी ट्विट केले आहे. याशिवाय येत्या 19 नोव्हेंबररोजी पोटनिवडणुका असल्याचे निदर्शनास आणून "शाई लावण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगाला काय म्हणायचे आहे?' अशी विचारणाही बॅनर्जी यांनी केली आहे.

देशभरात पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे म्हणत शेतकऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे.

Web Title: Govt distrusts the common people : Banerjee