कर्नाटकात रेड्डींचा 500 कोटींचा 'शाही विवाह'!

कर्नाटकात आज 500 कोटींचा 'शाही विवाह'!
कर्नाटकात आज 500 कोटींचा 'शाही विवाह'!

कर्नाटकमधील माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा बंगळूर येथे बुधवारी संपन्न होत असलेला शाही विवाह हा संपूर्ण देशातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. खाणसम्राट म्हणून ओळख असलेल्या जनार्दन रेड्डी यांनी या लग्नासाठी तब्बल 500 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे.

या विवाहसमारंभाची वैशिष्ट्ये

जनार्दन रेड्डी यांची पार्श्‍वभूमी
जनार्दन रेड्डी यांचे वडिल चेंगा रेड्डी हे चित्तोर येथे पोलिस हवालदार होते. 1999 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर जनार्दन चर्चेत आले. रेड्डी बंधूंनी त्यावेळी सुषमा स्वराज यांच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. त्यानंतर 2004 मध्ये त्यांना कर्नाटकातील लोखंडाच्या खाणीचा पहिला परवाना मिळाला. त्यानंतर बेकायदा खाण प्रकरणात अडकल्याने त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. सध्या ते जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीमुळे त्यांच्या कन्येचा विवाह चर्चेत आला आहे.

अत्यंत खर्चिक, अत्याधुनिक निमंत्रण पत्रिका
जनार्दन रेड्डी यांनी केवळ निमंत्रण पत्रिकांसाठी 5 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. एका बॉक्‍समध्ये असलेल्या निमंत्रणपत्रिकेत एलसीडी स्क्रीन लावलीे आहे. बॉक्‍स उघडल्यानंतर LCD स्क्रीन सुरू होते आणि त्यावर रेड्डी कुटुंबीय निमंत्रण देत असल्याचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसतो.

पाहुण्यांच्या सुरक्षेची व्यवस्था
यजमानांनी येथील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशा बंगळूर पॅलेसच्या मैदानावर होणाऱ्या या विवाह समारंभाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची चांगलीच काळजी घेतली आहे. त्यासाठी तब्बल 3000 बाउन्सर्स आणि 300 पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. विवाहस्थळी बॉम्बशोधक पथकासह श्‍वानपथकेही तैनात करण्यात आली आहेत.

धार्मिक विधींसाठी तिरूपती-तिरूमला मंदिरातील पुजारी
धार्मिक विधी करण्यासाठी तिरूपती-तिरूमला मंदिरातील पुजाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय दोन्ही कुटुंब विवाहापूर्वी विविध पूजाही करणार आहेत.

विवाह समारंभातील व्यवस्था
जनार्दन रेड्डी यांनी विवाह समारंभातील व्यवस्थेसाठी 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर पाहुण्यांच्या वाहतुकीसाठी 20 कोटी, तर 20 कोटी रुपये भोजन व्यवस्थेसाठी खर्च करण्यात येणार आहेत. वधू, वर आणि कुटुंबीयांच्या दागिन्यांपोटी शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा सर्व खर्च भागविण्यासाठी त्यांनी त्यांच्या 10 मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. या शिवाय परदेशातील काही मालमत्ताही गहाण ठेवल्या आहेत. या संदर्भातील सर्व व्यवहार रेड्डी कुटुंबियांनी सहा महिन्यांपूर्वीच सुरू केला होता.

विवाहस्थळावरील सजावट
बंगळूर पॅलेसच्या मैदानावर होणाऱ्या या समारंभांमुळे मैदानाला रेड्डी यांचे गाव असलेल्या बेल्लारी या छोट्या गावासारखे स्वरूप देण्यात आले आहे. वधू आणि वराच्या कुटुंबीयांसाठी दोन निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. विवाहस्थळाच्या मध्यभागी बॉलिवूडच्या कला दिग्दर्शकांनी विजयनगर पद्धतीचे मंदिर उभारले आहे.

बड्या पाहुण्यांना निमंत्रण
रेड्डी यांनी या शाही विवाहाचे निमंत्रण हजारो पाहुण्यांना दिले आहे. त्यामध्ये राजकीय नेते, मोठे व्यावसायिक, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश आहे. त्यांनी कन्नड, तेलुगू आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनाही निमंत्रित केले आहे. काही सेलिब्रिटी नृत्य सादर करणार आहेत. त्यासाठी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केल्याची चर्चा आहे.

पाहुण्यांची व्यवस्था
विवाह समारंभासाठी तब्बल 50 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी यजमान रेड्डी यांनी शहरातील तारांकित हॉटेल्समध्ये तब्बल 1500 खोल्या बुक करून ठेवल्या आहेत. तसेच, त्यांच्या वाहतुकीसाठी 2000 कॅब कार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शिवाय अतिमहत्वाच्या व्यक्तींना विवाहस्थळी पोचण्यासाठी 15 हेलिपॅडस तयार करण्यात आली आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्तींना सजवलेल्या बैलगाड्यांमधून विवाहस्थळी आणले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com