पायाभूत उद्योगांची वाढ कमी 

पीटीआय
मंगळवार, 3 जुलै 2018

पायाभूत क्षेत्रातील प्रमुख आठ उद्योगांची वाढ मे महिन्यात 3.6 टक्‍क्‍यांवर आली आहे. मागील दहा महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात झालेली घट याला कारणीभूत ठरली आहे. 

नवी दिल्ली : पायाभूत क्षेत्रातील प्रमुख आठ उद्योगांची वाढ मे महिन्यात 3.6 टक्‍क्‍यांवर आली आहे. मागील दहा महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात झालेली घट याला कारणीभूत ठरली आहे. 

पायाभूत उद्योगांमध्ये कोळसा, तेल शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वीज यांचा समावेश आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पायाभूत उद्योगांची वाढ मे 2017 मध्ये 3.9 टक्के होती. यंदा मे महिन्यात ही वाढ केवळ 3.6 टक्के आहे. जुलै 2017 नंतरची ही नीचांकी वाढ ठरली आहे. त्या वेळी ही वाढ 2.9 टक्के होती. या वर्षी एप्रिल महिन्यात ही वाढ 4.6 टक्के होती. 

मागील वर्षातील मे महिन्याच्या तुलनेत या वर्षी मेमध्ये पायाभूत उद्योगांची वाढ कमी आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायू उद्योगांची वाढ अनुक्रमे 2.9 आणि उणे 1.4 टक्के आहे. तेल शुद्धीकरण उत्पादने, पोलाद, वीज या उद्योगांची वाढ अनुक्रमे 4.9, 0.5 आणि 3.5 टक्के आहे. कोळसा आणि खते या उद्योगांची वाढ मागील वर्षीपेक्षा अधिक असून, ती अनुक्रमे 12.1 आणि 8.4 टक्के आहे. 
 
पायाभूत उद्योगांची वाढ 
एप्रिल ते मे 2017 : 3.3 टक्के 
एप्रिल ते मे 2018 : 4.1 टक्के 

Web Title: Growth of basic industries decreases