'जीएसटी'चा दिलासा; दोनशे वस्तूंवरील कर कमी

GST
GST

गुवाहाटी : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरांबाबत विरोधक आणि उद्योजकांकडून होणाऱ्या टीकेमुळे केंद्र सरकारने शुकवारी जीएसटीच्या दरात मोठे फेरबदल केले. "जीएसटी' परिषदेच्या येथे झालेल्या बैठकीत दैनंदिन वापरातील 178 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यात आला. हा सुधारित जीएसटी 15 नोव्हेंबरपासून लागू होईल. एकूण सुमारे दोनशे वस्तूंवरील कर कमी करण्यात येणार आहे. 

"जीएसटी"मधील ऐतिहासिक कर कपातीचे कर सल्लागारांनी जोरदार स्वागत केले असून, सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे सरकारला मात्र कर महसुलाच्या रूपात 20 हजार कोट रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे. च्युइंग गम, शॅम्पू, टूथपेस्ट चॉकलेटपासून डिटर्जंट, शू-पॉलिश, ग्रॅनाइट, मार्बल, सौंदर्य प्रसाधने आदी तब्बल 178 वस्तूंवरील कर 18 टक्के करण्यात आला आहे. आता जवळपास 50 वस्तू 28 टक्‍क्‍यांच्या कर कक्षेत उरल्या आहेत. यापूर्वी 28 टक्‍क्‍यांच्या कर कक्षेत 228 वस्तू आणि सेवांचा समावेश होता. 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली "जीएसटी' परिषदेची 23 वी बैठक आज पार पडली. या बैठकीसाठी 228 पैकी 62 वस्तू 28 टक्के करात कायम ठेवण्याची शिफारस करण्यात आली होत. समितीने आणखी 12 वस्तू त्यातून कमी करत एकूण 178 वस्तूंवरील कर 18 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला. याशिवाय फ्लाय ऍश (कोळसा भुकटी), ज्यूट बॅगवरील कर 18 टक्‍क्‍यांवरून 12 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला आहे. या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या महसुलवर परिणाम होणार आहे. केंद्राला यामुळे जवळपास 20 हजार कोटींचा महसूल गमवावा लागेल. 

या वस्तू होणार स्वस्त 
च्युइंग गम, शॅम्पू, टूथपेस्ट, चॉकलेट, डिटर्जंट, शू-पॉलिश, ग्रॅनाइट, मार्बल, सौंदर्य प्रसाधने, न्यूट्रिशनल ड्रिंक, शेव्हिंग क्रीम आणि लोशन, पेंट्‌स, सिमेंट, वॉशिंग मशीन, एसी, अग्निरोधक, घड्याळ, ब्लेड, स्टोव्ह, मॅट्रेस आदी वस्तूंवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. 

पंचतारांकित हॉटेलांवरील कर कमी 
यापूर्वी पंचतारांकित हॉटेलमधील मुक्कामासाठी 28 टक्के जीएसटी द्यावा लागत होता. आता सरकारने हॉटेलांसाठी एकच श्रेणी केली असून, सरसकट 18 टक्के कर कक्षेत समावेश करण्यात आला आहे. 

रेस्टॉरंटमधील खानपान स्वस्त 
एसी आणि साध्या रेस्टॉरंटमधील "जीएसटी"मधील तफावत दूर करत परिषदेने एकच दर निश्‍चित केला आहे. यामुळे ग्राहकांना आता हॉटेलमधील बिलांवर पाच टक्के कर द्यावा लागेल. यापूर्वी साध्या हॉटेलमध्ये 12 टक्‍के आणि एसी हॉटेलमध्ये 18 टक्के जीएसटी आकारला जात होता. 

तिमाहीतून एकदाच विवरणपत्र 
छोट्या व्यवसायिकांना यापुढे तिमाहीतून एकदाच कर विवरणपत्र सादर करावे लागणार आहे. यासाठी आवश्‍यक "फॉर्म बी-3' मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय विवरणपत्र भरण्यामध्ये विलंब करणाऱ्यांवरील दंडात्मक रक्कमदेखील कमी करण्यात आली आहे. आता दररोज 200 रुपयांऐवजी 20 रुपये दंड आकारला जाणार आहे. इतर करदात्यांसाठी तो 200 रुपयांऐवजी 50 रुपये असेल, असे महसूल सचिव हसमुख आधिया यांनी म्हटले आहे. 

178 वस्तूंचे दर 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्के 
13 वस्तूंचे दर 18 टक्‍क्‍यांवरून 12 टक्के 
6 वस्तूंचे दर 18 टक्‍क्‍यांवरून 5 टक्के 
8 वस्तूंचे दर 12 टक्‍क्‍यांवरून 5 टक्के 
6 वस्तू 5 टक्‍क्‍यांवरून करमुक्‍त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com