इंधनावर टप्प्याटप्प्याने जीएसटी : केंद्रीय अर्थ सचिव अधिया

पीटीआय
शनिवार, 7 जुलै 2018

पेट्रोलियम उत्पादने जीएसटी कक्षेत आणण्याची मागणी होत आहे. यावर जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेणार आहे. 

- एस. रमेश, अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ 

नवी दिल्ली : पेट्रोलियम उत्पादने वस्तू व सेवाकरांतर्गत (जीएसटी) आणण्याबाबत जीएसटी परिषद निर्णय घेणार असून, टप्पाटप्प्याने ही उत्पादने जीएसटी कक्षेत आणली जाऊ शकतात, अशी माहिती केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अधिया यांनी शुक्रवारी दिली. 

हसमुख अधिया म्हणाले, ""पेट्रोलियम उत्पादने जीएसटी कक्षेत आणण्याची मागणी होत आहे. ही उत्पादने टप्प्याटप्प्याने जीएसटी कक्षेत आणली जाऊ शकतील. सध्याची जीएसटी यंत्रणा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. जीएसटीमध्ये परताव्याची प्रक्रिया स्वयंचलित होती. मात्र, करदात्यांनी विवरणपत्र भरण्यामध्ये केलेल्या अनेक चुकांमुळे स्वयंचलित परतावा देण्यात अडचणी निर्माण झाल्या. यापुढील काळात पुन्हा स्वयंचलित परतावा सुरू करण्यात येईल.'' 

सध्या पेट्रोल, डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि विमान इंधनाला जीएसटी आणि सेवाकर लागू नाही. यावर मूल्यवर्धित कर आकारण्याचा अधिकार राज्यांना आहे. विमान इंधनावरील जादा कराबाबत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नुकतीच चिंता व्यक्त केली होती. विमान कंपन्यांच्या कामकाज खर्चात सर्वाधिक वाटा इंधनावरील जादा कराचा असून, याचा परिणाम तिकीट दरांवर होत आहे. 

Web Title: GST on Fuel will be at the time of the fiasco says Central Finance Secretary Adhia