जीएसटी हे टीम इंडियाचे जिवंत उदाहरण : नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

स्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होण्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी सरकारने "जीएसटी दिवस' धूमधडाक्‍यात साजरा केला. जीएसटी हे संघराज्य व्यवस्था आणि टीम इंडियाचे जिवंत उदाहरण असल्याची प्रशंसा पंतप्रधान मोदींनी केली. तर, जीएसटी हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला. 

नवी दिल्ली - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होण्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी सरकारने "जीएसटी दिवस' धूमधडाक्‍यात साजरा केला. जीएसटी हे संघराज्य व्यवस्था आणि टीम इंडियाचे जिवंत उदाहरण असल्याची प्रशंसा पंतप्रधान मोदींनी केली. तर, जीएसटी हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला. 

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (ता. 1 जुलै) भव्य सोहळ्याद्वारे जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यानंतर वर्षभरात जीएसटी परिषदेने कर सुधारणा, विवरणपत्र सादरीकरण याबाबतचे विविध निर्णयही केले. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर "जीएसटी'च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मोदींनी "ट्विट"द्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या. "जीएसटी' हे सहकारी संघराज्यवाद आणि टीम इंडियाच्या भावनेचे जिवंत उदाहरण असून, जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे मोदी म्हणाले. यासोबतच पंतप्रधानांनी जीएसटीचा संदेश देणाऱ्या "एक राष्ट्र एक कर' या पोस्टरचे प्रकाशन केले. 

दुसरीकडे अर्थ मंत्रालयातर्फे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जीएसटीवर बनविण्यात आलेल्या "वन इयर ऑफ जीएसटी' या चित्रफितीचेही प्रदर्शन झाले. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे जीएसटीची अंमलबजावणी शक्‍य झाल्याचे सांगितले. यापूर्वीची सरकारे जीएसटीबद्दल फारशी गंभीर नव्हती. परंतु, जीएसटी ही काळाची आणि देशाचीही गरज होती. राज्यांना महसूल बुडण्याची चिंता वाटत होती. परंतु जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल झाले. जीएसटी आणि नोटबंदीमुळे गेल्या वर्षभरात प्रत्यक्ष करवसुलीमध्ये 18 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तर, एनडीए सरकारच्या चार वर्षांच्या सत्ताकाळात एकूण कर वसुलीत दीड टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचेही जेटली म्हणाले. 

जीएसटीमुळे व्यवसाय करण्यात सुलभता येण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या जगण्यामध्येही लक्षणीय परिवर्तन झाले. जीएसटीमुळे फसवणुकीचे सर्व मार्ग बंद झाले. - पीयूष गोयल, विद्यमान अर्थमंत्री आणि रेल्वेमंत्री 

Web Title: GST is Live example of Team India says Narendra Modi