गुजरातमध्ये भीषण अपघातात ट्रकने 13 मजूरांना चिरडले; PM मोदींनी व्यक्त केला शोक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

गुजरातमध्ये आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडलीय.

सूरत : गुजरातमध्ये आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडलीय. सूरतमधील कोसांबामध्ये एका ट्रकने 13 लोकांना चिरडून टाकलं आहे. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे मजूर होते. तसेच ते राजस्थानचे रहिवासी होते.

या घटनेबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. मोदींनी म्हटलंय की, सुरतमध्ये ट्रकच्या अपघातामुळे जीवितहानी झाल्याची घटना दुःखद आहे. माझ्या सहवेदना शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होतील, अशी प्रार्थना करतो.

 

मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. किमान 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. जागीच ठार झालेल्या 13 जणांबरोबरच आणखी दोन जण देखील मृत झाल्याचे वृत्त आहे. या जबरी अपघातात सहाजण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात उपाचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे बोललं जात आहे. नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावरच गेला. या भीषण दुर्घटनेची माहिती रात्री पोलिसांना मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित झाला. सध्या यातील जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मदतकार्य सुरु आहे. 

हा अपघात सूरतमधील पलोड गावाजवळील किम मांडवी रस्त्यावर घडला आहे. किम हाकर मार्गाजवळ रात्री बारानंतर झालेल्या या अपघातात एक ट्रक उसाच्या ट्रॅक्टरला जोरात धडकला. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लिनर देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat 13 people died after they were run over by a truck in Kosamba Surat