Gujarat Elections 2022: गुजरातमध्ये मतदानाचे अपडेट्स जाणून घ्या; 'आप'ने गंभीर आरोप केले आहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Elections 2022

Gujarat Elections 2022: गुजरातमध्ये मतदानाचे अपडेट्स जाणून घ्या; 'आप'ने गंभीर आरोप केले आहेत

Gujarat Assembly Election 2022 Phase 1 Seats Voting

गुजरात विधानसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिल्या टप्प्यासाठी १९ जिल्हे आणि ८९ मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. या ८९ मतदारसंघांमध्ये ७८८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

गुजरातमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १८.९५ टक्के मतदान झालेलं आहे. आम आदमी पक्षाचे गुजरात अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी धिम्या वोटिंगचा आरोप लावला आहे. त्यांनी ट्विट केलं की, कतारगाम विधानसभा मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक धिम्या गतीने मतदान सुरु आहे.

इटालिया यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशाच प्रकारे जर गुंडांच्या दबावाखाली मतदान घ्यायचं असेल तर निवडणुका का घेता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कोणाचं किती संख्याबळ?

  • २०१७मधील निवडणुकीत मध्य गुजरातच्या ६८ पैकी ४० जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसचा २४ जागांवर विजय झाला होता. तर अपक्ष आणि इतरांच्या खात्यात ४ जागा पडल्या होत्या.

  • कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये काँग्रेस भाजपपेक्षा पुढे होता. ५४ पैकी ३० जागांवर काँग्रेस तर २३ जागांवर भाजपने विजय मिळवलेला. तर एक आमदार अपक्ष म्हणून निवडून आलेला होता.

  • उत्तर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमधली रणधुमाळी भलतीच गाजली. येथील ३२ पैकी १७ विधानसभेच्या जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. तर १४ जागा भाजपच्या खात्यात पडल्या. एका जागेवर काँग्रेस पुरस्कृत जिग्नेश मेवाणी विजयी झाले होते.

  • दक्षिण गुजरातमध्ये भाजपने एकतर्फी विजय मिळवला होता. या भागातल्या २८ मतदारसंघांपैकी २२ जागांवर भाजपने वर्चस्व सिद्ध केलं. उर्वरित ६ जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या होत्या.