Gujarat Assembly Election : बलाढ्य बंडखोर उमेदवारांचे भाजपला आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Election 2022

Gujarat Assembly Election : बलाढ्य बंडखोर उमेदवारांचे भाजपला आव्हान

वाघोडिया : भाजपचे दोन बंडखोर नेते वाघोडिया मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. एकमेकांविरोधात उभे असलेल्या या उमेदवारांनी निवडून आल्यास भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. पण यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराची कोंडी झाली.

भाजपचे सहावेळा विधानसभेवर निवडून आलेले व पक्षाने निलंबित केलेले आमदार मधू श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंह वाघेला हे वाघोडियातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या दोघांची मतदारसंघातील ओळख ही ‘दबंग’ आणि ‘बाहुबली’ अशी आहे. या दोन्ही नेत्यांना तिकीट नाकारून भाजपने पक्षाचे बडोदा जिल्हाअध्यक्ष अश्विन पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसमध्ये उत्साह

वाघोडियातील निवडणुकीबद्दल काँग्रेसमध्ये उत्साहवर्धक वातावरण आहे. भाजपच्या विभागलेल्या मतदानाचा जास्तीत जास्त फायदा मिळण्याची काँग्रेसला आशा आहे. भाजपमधील फुटीचा लाभ काँग्रेसला होणार असून ‘आप’ला यंदा केवळ दीड हजार मते मिळतील, असा दावा काँग्रेसचे उमेदवार व बडोद्याचे माजी खासदार सत्यजित गायकवाड यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘‘ मतदारांचा कानोसा घेतला असता, या वेळी त्यांना बदल हवा आहे, असे दिसत आहे. मतदारसंघात ‘आप’चे अस्तित्व मात्र दिसत नाही.’’

उमेदवारापेक्षा भाजपला महत्त्व आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवारच निश्‍चित विजयी होणार आहे. वाघोडियात ६५ टक्के मतदान क्षत्रिय समाजाचे असून त्यापैकी ५० टक्के भाजपचे पारंपरिक मतदार आहेत.

- उत्सवभाई पारीख, सरचिटणीस, भाजप किसान मोर्चा, बडोदा