खातेवाटपामुळे रूपानी सरकार संकटात 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 31 डिसेंबर 2017

हार्दिक ऑफर 
पटेल यांच्या नाराजीनंतर पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी त्यांना खुली ऑफर दिली आहे. दहा आमदारांसोबत भाजप सोडा आणि कॉंग्रेसमध्ये या! येथे तुम्हाला हवी ती खाती दिली जातील, असे हार्दिक यांनी म्हटले आहे. मागील 27 वर्षांपासून पक्षामध्ये काम करणाऱ्या नितीन पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा भाजप अवमान करत आहे. पटेल हे भाजप सोडायला तयार असतील तर आपण त्यांच्यासाठी कॉंग्रेस नेतृत्वाशी चर्चा करायला तयार आहोत, असे हार्दिक पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

अहमदाबाद : गुजरातमध्ये ताज्या खातेवाटपावरून रूपानी सरकार धर्मसंकटात सापडले असून, मनाजोगी खाती न मिळाल्याने नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी थेट राजीनाम्याचीच धमकी दिली आहे. अर्थ, नगरविकास आणि पेट्रोकेमिकल ही तीन महत्त्वाची खाती आपल्याकडे दिली जावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. दिल्लीच्या मध्यस्थीने खातेवाटप पार पडल्यानंतर पटेल यांनी शुक्रवारीच पदभार स्वीकारणे अपेक्षित होते; पण त्यांनी तसे करणे जाणीवपूर्वक टाळल्याचे समजते. पटेल यांनी राज्य सरकारला तीन दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे. 

नव्या मंत्रिमंडळात आपल्याला सोयीस्करपणे बाजूला करण्यात आले असून, हा माझा अवमान आहे, त्यामुळेच आता मला उपमुख्यमंत्रिपदी राहणे योग्य वाटत नाही. पक्षश्रेष्ठींशी संवाद साधत आपण राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण त्यांनीच दोन दिवस थांबा असे निर्देश दिल्याचे पटेल यांनी नमूद केले. सध्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक पातळीवरील नेतृत्व पटेल यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी रूपानी सरकारमधील खातेवाटपाची प्रक्रिया पार पडल्यानंतर नितीन पटेल यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली होती. दिल्लीतील नेत्यांनी आपला शब्द पाळला नाही, त्यामुळे आपला स्वाभिमान दुखावला असून, आपण कधीही राजीनामा देऊ शकतो, अशा भावना त्यांनी निवडक पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या होत्या. 

हार्दिक ऑफर 
पटेल यांच्या नाराजीनंतर पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी त्यांना खुली ऑफर दिली आहे. दहा आमदारांसोबत भाजप सोडा आणि कॉंग्रेसमध्ये या! येथे तुम्हाला हवी ती खाती दिली जातील, असे हार्दिक यांनी म्हटले आहे. मागील 27 वर्षांपासून पक्षामध्ये काम करणाऱ्या नितीन पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा भाजप अवमान करत आहे. पटेल हे भाजप सोडायला तयार असतील तर आपण त्यांच्यासाठी कॉंग्रेस नेतृत्वाशी चर्चा करायला तयार आहोत, असे हार्दिक पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

पटेलांचा पाठिंबा 
गुजरातमधील पाटीदार संघटना या नितीन पटेल यांच्या पाठीशी उभ्या राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरदार पटेल ग्रुपचे प्रमुख लालजी पटेल यांनी आज दुपारीच नितीन यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. नितीन पटेल यांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी 1 जानेवारी रोजी मेहसाणा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे आमदार केतन पटेल यांनीही उपमुख्यमंत्र्यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश करा आणि मुख्यमंत्रिपद मिळवा, अशी ऑफर देऊ केली आहे. 

Web Title: Gujarat Deputy CM Nitin Patel Sets 3 Day Deadline for Vijay Rupani Patidar Group Threatens Stir