गुजरात निवडणुकांचे बिगुल वाजले, 18 डिसेंबरला लागणार निकाल

वृत्तसंस्था
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान

गुजरातमध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत कमाल 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निश्चित केल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे होमग्राऊंड असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत. 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 18 डिसेंबर रोजी निकाल लागेल.

गुजरातमध्ये त्वरीत आचारसंहिता लागू झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ए.के. ज्योती यांनी सांगितलं. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 22 जानेवारीला संपणार आहे. गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून 50 हजार 128 मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्यापैकी 102 केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. सर्व केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांवर व्हिडिओ रेकॉर्डिंगही होणार आहे.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांसोबतच निवडणूक आयोगाने गुजरातच्या निवडणुका जाहीर न केल्याने विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणांगणांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही ताकदीने उतरल्याने भाजपसाठी ही निवडणूक आणखीनच प्रतिष्ठेची बनली आहे. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी 9 नोव्हेंबर 2017 रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबरला मतदान आहे. तर प्रचंड विरोधानंतर निवडणूक आयोगाने गुजरात निवडणूक 18 डिसेंबरपूर्वीच पार पडेल, असं जाहीर केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने आव्हान दिले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी महिनाभरात पाचवेळा गुजरात दौरा केला. गुजरात निवडणुकीला 2019 च्या लोकसभेची उपांत्य फेरी मानली जात आहे. मोदी लाट आहे की नाही हे या निवडणुकीतून समोर येणार आहे. दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निवडणुकीत जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी येण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. लोकसभेसाठी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे 26 जागा जिंकल्या होत्या.

गुजरातेत 22 वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या भाजपाविरुद्ध वातावरण असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, गुजरात विधानसभेमध्ये 182 पैकी भाजपला 115 ते 125 जागा तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवत आज तक, इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणामधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Gujarat elections news dates declared